

लंडन : आदिमानवाच्या प्रजातींपैकी एक असलेल्या ‘निएंडरथल’ बालकांचा शारीरिक विकास आधुनिक मानवाच्या तुलनेत अधिक वेगाने होत होता. अतिशय थंड आणि खडतर हवामानात तग धरण्यासाठी निएंडरथलमध्ये हा उत्क्रांतीजन्य बदल झाला असावा, असा दावा एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे.
1990 च्या दशकात उत्तर इस्रायलमधील ‘अमुद’ गुहेत एका निएंडरथल बालकाचे अवशेष सापडले होते. या अवशेषांच्या अभ्यासानंतर संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. ‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात 15 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, सुमारे 6 लाख वर्षांपूर्वी एकाच पूर्वजापासून वेगळे झाल्यानंतर निएंडरथल आणि आधुनिक मानव (होमो सेपियन्स) यांनी उत्क्रांतीचे वेगवेगळे मार्ग स्वीकारले होते. संशोधकांनी या बालकाच्या सांगाड्याला ‘अमुद 7’ असे नाव दिले आहे. हा सांगाडा 51,000 ते 56,000 वर्षांपूर्वीचा असून तो 100 पेक्षा जास्त तुकड्यांमध्ये सापडला होता. विशेष म्हणजे, या बालकाच्या हाडांवर अगदी लहान वयातही निएंडरथल प्रजातीची वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसून आली.
पुरातत्त्वशास्त्रज्ञ सामान्यतः बाळाच्या दातांची वाढ आणि हाडांच्या आकारावरून त्याचे वय ठरवतात. ‘अमुद 7’च्या बाबतीत संशोधकांना एक मोठी तफावत आढळली: दातांनुसार वय : जेव्हा या बालकाच्या खालच्या पुढच्या दातांची तुलना आधुनिक मानवाशी केली, तेव्हा त्याचे वय साधारण 6 महिने भरले. हाडांनुसार वय : मात्र, त्याच बालकाच्या हाता-पायांच्या हाडांची लांबी आणि आकार पाहिला असता, ते आधुनिक मानवाच्या 14 महिन्यांच्या बाळाशी मिळतेजुळते होते. संशोधनानुसार, निएंडरथल आणि मानवी बालके जन्मतः सारखीच असली, तरी निएंडरथल बाळांची कवटी जन्मावेळी मोठी असे.
वाढीच्या दुसर्या टप्प्यात (1 ते 6 वर्षे वयोगट) निएंडरथल बालकांचे शरीर त्यांच्या दातांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत असे. याउलट, आधुनिक मानवी बाळांमध्ये दात आणि शरीराची वाढ एकाच प्रमाणात होते. उत्तर बालपणात मात्र निएंडरथल आणि मानवी मुलांच्या वाढीचा वेग पुन्हा एकमेकांशी जुळणारा असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे. प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी निएंडरथलना बालपणात वेगाने मोठे होणे आवश्यक होते, असे या संशोधनातून सूचित होते.