

नवी दिल्ली : ‘नासा’च्या संशोधकांना BL Lacertae नावाचं एका विशाल कृष्णविवराचे रहस्य उलगडण्यात यश आलं आहे. कृष्णविवराचे एक्स-रे किरण कशा प्रकारे निर्माण होतात, हे शास्त्रज्ञांसाठी बराच काळ रहस्य होतं. नासाच्या इमेजिंग एक्स-रे पोलारिमेट्री एक्सप्लोरर (IXPE) नं आता या रहस्याचा उलगडा केला आहे. रेडिओ आणि ऑप्टिकल टेलिस्कोपच्या सहकार्यानं याचा उलगडा झाला आहे. एक्स-रे पोलारायझेशन मोजमापांचा वापर करून IXPE नं दाखवले आहे की, वेगानं फिरणारे इलेक्ट्रॉन आणि फोटॉन्स यांच्यातील परस्परक्रिया एक्स-रे उत्सर्जनाचं कारण असू शकतं.
IXPE च्या निष्कर्षांनुसार, ऑप्टिकल ते एक्स-रे पोलारायझेशनचं उच्च गुणोत्तर दर्शवतं की, कॉम्प्टन स्कॅटरिंग हे एक्स-रे निर्मितीचं यंत्रण असू शकतं. ब्लझार जेटस्मधील एक्स-रे उत्सर्जनासाठी दोन संभाव्य स्पष्टीकरणे आहेत. जर एक्स-रे अत्यंत पोलराइज्ड असतील, तर ते फोटॉन्सच्या परस्परक्रियांमुळं निर्माण होतात, तसंच कमी पोलरायझेशन इलेक्ट्रॉन-फोटॉन परस्परक्रियांमुळं एक्स-रे तयार होतात.IXPE च्या अनन्य एक्स-रे पोलारायझेशन मोजण्याच्या क्षमतेचा उपयोग करून शास्त्रज्ञांनी नोव्हेंबर 2023 मध्ये BL Lac वर केंद्रीत निरीक्षण केलं. या BL Lac चे ऑप्टिकल पोलरायझेशन 47.5% वर पोहोचलं, जे कोणत्याही ब्लझारसाठी आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. परंतु, IXPE ला एक्स-रे पोलरायझेशन केवळ 7.6% आढळलं. हा विरोधाभास कॉम्प्टन स्कॅटरिंगला समर्थन देतो आणि फोटॉन-आधारित स्पष्टीकरणाला नाकारतो. “हा सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल जेटस्बद्दलच्या सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक होता,” असं या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि स्पेनमधील इन्स्टिट्यूटो डी अस्ट्रोफिसिका डी अँडालुसिया ड्ढ CSIC येथील खगोलशास्त्रज्ञ इवान अगुडो यांनी सांगितलं. हा शोध IXPE च्या डिसेंबर 2021 मध्ये सुरू झालेल्या मिशनची पुष्टी करतो. खगोलभौतिकशास्त्रज्ञ एनरिको कोस्टा यांनी याला IXPE च्या सर्वात महत्त्वाच्या यशांपैकी एक म्हटलं आहे.