

न्यूयॉर्क : बटाट्याला अगदी कोणत्याही भाजीत मिसळलात, तरी तिचा स्वाद वाढत राहतो. या बहुपयोगी भाजीलाच समर्पित करून दरवर्षी 30 मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस’ साजरा केला जातो. विशेष म्हणजे, या दिवसाची सुरुवात नुकतीच 2024 पासून झाली आहे; पण ‘नासा’ने इतक्यावर न थांबता बटाटा एका अनोख्या प्रयोगाचा एक भाग म्हणून अंतराळातही पाठवलेला आहे. कारण, त्यांना हे पाहायचं होतं की, शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये झाडं उगवू शकतात का? आणि अंतराळात जाणार्या प्रवाशांना ताजं अन्न मिळवता येईल का?
सर्व भाज्यांमध्ये बटाट्याची निवड करण्यात आली. याचे कारण असे की, तो कठीण हवामानातही तग धरतो आणि वेगवेगळ्या परिस्थितीत सहज उगवता येतो. शिवाय त्याचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये उपयोग करता येतो. नासाने तर मंगळ ग्रहावरही बटाट्याचे पीक घेता येईल का, यावर अभ्यास सुरू केला आहे, जेणेकरून भविष्यात माणसं तिथे राहिली, तर त्यांना अन्न मिळू शकेल. बटाट्यामध्ये अशी क्षमता आहे की, तो फक्त पृथ्वीवर नाही, तर बिकट परिस्थितीतही उगवू शकतो. म्हणूनच तो मंगळ ग्रहासाठी एक योग्य फूड सोर्स मानला जातो.
नासाने ‘व्हेगी‘ नावाची प्रणाली विकसित केली आहे, ज्यात अंतराळात झाडे उगवली जातात. बटाट्यावर आधारित अनेक प्रयोगही झालेत. मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये बटाटा वाढतो का, किंवा बटाट्यापासून काँक्रीट तयार होऊ शकतो का, यावरही संशोधन झाले आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये 7,000 वर्षांपूर्वीपासून बटाट्याची शेती केली जात होती. तिथे त्याला ‘बटाटा’ किंवा ‘कामाटा’ म्हणायचे. पुढे 16 व्या शतकात हा बटाटा स्पेनमार्गे युरोपात पोहोचला आणि त्याला ‘पोटॅटो’ असे नाव मिळाले. बि—टिश जेव्हा कोलकात्यात स्थायिक झाले, तेव्हा त्यांनी जवळपास प्रत्येक बंगाली डिशमध्ये बटाटा वापरायला सुरुवात केली. लखनौचे नवाब वाजिद अली शाह जेव्हा कोलकात्याला आले, तेव्हा त्यांच्या शाही स्वयंपाक्यांनीही बटाटाचा वापर केला. तिथून हळूहळू बटाटा संपूर्ण भारतभर लोकप्रिय झाला.