NASA Moon mission | ‘नासा’ चंद्रावर उभारणार अणुभट्टी!

‘नासा’चे कार्यकारी प्रमुख सीन डफींनी केली घोषणा
NASA Moon mission
NASA Moon mission | ‘नासा’ चंद्रावर उभारणार अणुभट्टी!Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ चंद्रावर अणुभट्टी उभारण्याच्या एका मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करत आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट 2030 पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती शक्य करणे हे आहे. ही योजना भविष्यात चंद्रावरील मानवी वस्त्या आणि वैज्ञानिक संशोधनासाठी अमर्याद ऊर्जेचा स्रोत प्रदान करेल. ‘नासा’चे कार्यकारी प्रमुख सीन डफी यांनी या योजनेची घोषणा केली.

ही योजना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारच्या अवकाश स्पर्धा तीव्र करण्याच्या धोरणाचा एक भाग मानली जात आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, ‘नासा’ या प्रकल्पासाठी लवकरच खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवणार आहे. ‘नासा’चे लक्ष्य 100 किलोवॉट क्षमतेची एक अणुभट्टी विकसित करणे आहे. ही अणुभट्टी चंद्रावरील भविष्यातील अर्थव्यवस्थेला गती देईल आणि अमेरिकेच्या अवकाश सुरक्षेला मजबूत करण्यास मदत करेल. यामागे एक प्रमुख चिंता अशी आहे की, जर रशिया किंवा चीनसारख्या इतर अवकाश महासत्तांनी चंद्रावर आधी अणुभट्टी उभारली, तर ते चंद्रावर आपला हक्क सांगू शकतात, ज्यामुळे अमेरिकेसमोरील आव्हाने वाढतील. याच कारणामुळे या प्रकल्पाला अत्यंत प्राधान्य दिले जात आहे.

या प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलर खर्च अपेक्षित आहे. ‘नासा’ने 2022 मध्येच तीन खासगी कंपन्यांना प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येकी 50 लाख डॉलर (सुमारे 40 कोटी रुपये) दिले होते. रोल्स-रॉयससारख्या कंपन्यांच्या अनुभवानुसार, अणुभट्टीची उभारणी, ऊर्जा वितरण आणि संचालन यासाठी प्रचंड खर्च येतो. हा प्रकल्प आर्टेमिस मिशनचा एक भाग असून, त्याचा अंदाजित खर्च 8,200 अब्ज रुपये आहे. डफी यांच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘नासा’ने पुढील 60 दिवसांच्या आत खासगी कंपन्यांकडून सूचना मागवाव्यात आणि या प्रकल्पासाठी लवकरच एका प्रमुख अधिकार्‍याची नियुक्ती करावी.

‘नासा’ अशा कंपन्यांच्या शोधात आहे, ज्या 2030 पर्यंत चंद्रावर अणुभट्टी स्थापित करून ती कार्यान्वित करू शकतील. ‘नासा’ची ही योजना केवळ चंद्रावर ऊर्जा मिळवण्यापुरती मर्यादित नाही, तर ती भविष्यातील मानवी वस्त्या, वैज्ञानिक संशोधन आणि आंतरराष्ट्रीय अवकाश धोरणांची दिशा ठरवणारी ठरू शकते. या प्रकल्पामुळे मानवाच्या अवकाश प्रवासाला एक नवी दिशा मिळणार असून, चंद्र भविष्यात पृथ्वीबाहेरील एक महत्त्वाचा तळ म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news