

न्यूयॉर्क : पृथ्वीचा किंवा पृथ्वीवरील जीव एक ना एक दिवस नष्ट होणार, याबाबत बरेच दावे केले जातात. काही वर्षांपूर्वी पृथ्वीवरून डायनासोर नष्ट झाल्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. ज्यामध्ये सर्वात जास्त मानला जाणारा सिद्धांत म्हणजे या प्राण्याचे अस्तित्व एक महाकाय उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यानंतरच संपले. आता ‘नासा’च्या सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने पृथ्वीवरील जीवन कधी आणि कसे संपेल हे शोधून काढले आहे. त्यानुसार डायनासोरच्या विपरीत मानवाचे नामशेष होण्याचे कारण लघुग्रह किंवा उल्कापिंड असणार नाही.
शास्त्रज्ञांच्या एका पथकाने सुपरकॉम्प्युटरच्या मदतीने पृथ्वीवरील जीवन कसे संपेल, याचा अंदाज वर्तवला आहे. हा अभ्यास काझुमी ओझाकी आणि क्रिस्टोफर टी. रेनहार्ड यांनी नेचर जिओसायन्स रिसर्चमध्ये प्रकाशित केला आहे. सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे आपला ग्रह हळूहळू राहण्यायोग्य होणार नाही. पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची पातळी अखेर संपेल आणि कोणीही जगणार नाही, असे या संशोधनात म्हटले आहे.
‘नासा’ आणि जपानच्या तोहो विद्यापीठातील सदस्यांचा समावेश असलेल्या या पथकाने असा निष्कर्ष काढला की, कोणत्याही वातावरणात नेहमीच पुरेसा ऑक्सिजन असू शकत नाही. हा निष्कर्ष भयावह होता.