नासाने ‘ब्लॅक मून’ची टिपली अनेक छायाचित्रे
न्यूयॉर्क : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने पृथ्वीच्या एका भागावरून ब्लॅक मूनची (काळा चंद्र) छायाचित्रे कॅमेराबद्ध केली आहेत. ही छायाचित्रे नासाने नुकतीच प्रसिद्ध केली आहेत. 'ब्लॅक मून' म्हणजे चंद्राचा असा भाग आहे की तो आपल्याला दिसत नाही.
चंद्र हा पृथ्वीचा अत्यंत महत्त्वाचा उपग्रह आहे. पृथ्वीच्या जवळ असूनही चंद्राबाबत अद्याप सविस्तर माहिती मानवाला मिळविता आलेली नाही. जसजसे चंद्राबाबत संशोधन होते, तसतशी नव नवीन माहिती आपल्यासमोर येत असते. प्रत्येक 32 महिन्यांच्या अंतराने पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागातून 'ब्लॅक मून'चे दर्शन घडत असते. यावेळी हा काळा चंद्र म्हणजे 'ब्लॅक मून' 18 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजून 41 मिनिटांनी म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार 19 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 11 मिनिटांनी दिसला. मात्र, तो भारतातून दिसलेला नाही, हेसुद्धा तितकेच खरे.
नासाने याच 'ब्लॅक मून'ची अनेक छायाचित्रे कॅमेराबद्ध करण्यात यश मिळविले. या छायाचित्रांच्या मदतीने चंद्राबाबतची आणखी नवी माहिती मिळविणे सोपे जाणार आहे. कारण, चंद्राच्या या भागाबाबत अद्याप म्हणावे तसे संशोधन झालेले नाही. खगोल शास्त्रज्ञांच्या मते, ब्लॅक मूनचा सविस्तर अभ्यास केल्यास चंद्राबाबत निश्चितपणे नवी माहिती मिळण्यास मदत मिळणार आहे. आता पुढील 'ब्लॅक मून' 30 एप्रिल 2022 रोजी दिसणार आहे.