

न्यूयॉर्क : ग्लेशियर (हिमनदी) हे सामान्यतः स्थिर असल्याचे मानले जाते; परंतु नासाच्या उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीमधून एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. तापमानवाढीला प्रतिसाद म्हणून ग्लेशियरच्या हालचालीत आश्चर्यकारक हंगामी बदल दिसून येतात. या शोधातून हवामान बदलांमुळे हिमनद्यांचे भविष्यातील वर्तन कसे असेल, याबद्दल महत्त्वाचे संकेत मिळत आहेत.
ग्लेशियर ही बर्फाची विशाल नदी असते, जी स्थिर नसून ती सतत गतिमान असते. सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, संशोधकांनी 2014 ते 2022 दरम्यान नासाच्या उपग्रहांनी टिपलेल्या 3.6 कोटींहून अधिक उच्च-रिझोल्यूशन प्रतिमांचे विश्लेषण केले. तापमानातील बदलांमुळे जगातील ग्लेशियरची गती हंगामानुसार कमी-जास्त होते, असे या अभ्यासात आढळले. काही ग्लेशियर वसंत ऋतूमध्ये तर काही उन्हाळ्यात वेगाने वाहतात. या हंगामी स्पंदनांचे सर्वात मोठे कारण म्हणजे बर्फ वितळून तयार होणारे पाणी आहे. जेव्हा वसंत किंवा उन्हाळ्यामध्ये तापमान वाढते, तेव्हा ग्लेशियरच्या पृष्ठभागावरील बर्फ वितळतो.
हे पाणी हिमनदीतील भेगांमधून खाली उतरून थेट हिमनदीच्या तळाशी पोहोचते. संशोधन पथकाचे प्रमुख ऑथर चॅड ग्रीन यांच्या मते, हे वितळलेले पाणी हिमनदीच्या तळाशी वंगणासारखे कार्य करते. त्यामुळे हिमनदीच्या तळाचे घर्षण कमी होते आणि ती वेगाने समुद्राकडे सरकते. या संशोधनात 2 लाखांहून अधिक ग्लेशियरचा अभ्यास करण्यात आला. जगभरातील ग्लेशियर त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार वेगवेगळे हंगामी नमुने दर्शवतात.
अलास्कातील ग्लेशियरमध्ये वसंत ऋतूच्या सुरुवातीस वेग वाढतो. युरोप आणि रशियातील आर्क्टिक प्रदेशातील ग्लेशियर उन्हाळ्याच्या अखेरीस किंवा शरद ऋतूच्या सुरुवातीस त्यांच्या सर्वाधिक वेगावर पोहोचतात. ग्लेशियरच्या हालचालीचा वेग हा त्यांच्या आरोग्याचा सूचक असतो. जो ग्लेशियर उबदार महिन्यांत अधिक वेगाने वाहतो, तो दीर्घकाळच्या तापमानवाढीला अधिक असुरक्षित असू शकतो. नासाच्या प्रकल्पांतर्गत ही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली गेली आहेत.