Artemis 2 mission photos | नासाकडून ’आर्टेमिस-2’ मोहिमेची ऐतिहासिक छायाचित्रे प्रसिद्ध

 Artemis 2 mission photos
मावळणार्‍या पृथ्वीचे द़ृश्य (अर्थसेट).
Published on
Updated on

वॉशिंग्टन : चंद्राच्या मागील बाजूने (Far Side) ऐतिहासिक प्रदक्षिणा घालणार्‍या ‘आर्टेमिस-2’ मोहिमेतील अंतराळवीरांनी टिपलेल्या छायाचित्रांचा पहिला संच नासाने प्रसिद्ध केला आहे. मानवी इतिहासात प्रथमच चंद्राच्या त्या दुर्गम भागातून पृथ्वी आणि सूर्यग्रहणाचे असे विलोभनीय द़ृश्य टिपण्यात आले आहे.

प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये ‘अर्थसेट’ नावाचे छायाचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये आपली निळी पृथ्वी चंद्राच्या खडबडीत पृष्ठभागाच्या मागे जाताना दिसत आहे. हे द़ृश्य 1968 मधील ‘अपोलो 8’ च्या प्रसिद्ध ‘अर्थराईज’ फोटोंची आठवण करून देणारे आहे. ज्यावेळी अंतराळवीर चंद्राच्या मागे जात होते, तेव्हा पृथ्वीवर अब्जावधी लोक झोपलेले असताना पृथ्वीच्या रात्रीच्या भागावर पडलेली सावली स्पष्टपणे दिसत होती. या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी चंद्राच्या मागे असताना एक अद्भुत सूर्यग्रहण अनुभवले. चंद्राने सूर्याला पूर्णपणे झाकल्यामुळे सुमारे 40 मिनिटे रेडिओ संपर्क पूर्णपणे तुटला होता, ज्याचा उपयोग अंतराळवीरांनी शांतपणे हे द़ृश्य पाहण्यासाठी केला. मोहीम तज्ज्ञ जेरेमी हॅन्सन म्हणाले, ‘जेव्हा आम्ही चंद्राच्या पलीकडे होतो आणि पृथ्वीकडे पाहत होतो, तेव्हा आम्ही एखाद्या कॅप्सूलमध्ये आहोत असे वाटतच नव्हते.

तो एक विलक्षण मानवी अनुभव होता. सूर्यग्रहणाच्या ‘खग्रास’ स्थितीत सूर्याचे बाह्य वातावरण म्हणजेच ‘कोरोना’ चंद्राच्या कडांवरून हलक्या प्रकाशासारखा दिसत होता, ज्याचे वर्णन अंतराळवीरांनी ‘लहान मुलांच्या केसांसारखे’ (जावळ) असे केले. या अंधारात त्यांना मंगळ, शुक्र आणि शनी हे ग्रह तार्‍यांच्या सोबत लख्ख चमकताना दिसले. विशेष म्हणजे, पृथ्वीप्रमाणेच अंतराळवीरांनीही हे ग्रहण पाहण्यासाठी ‘सोलर इक्लिप्स चष्मा’ वापरला. ‘आर्टेमिस-2’चे पायलट व्हिक्टर ग्लोव्हर यांनी चंद्राच्या ‘टर्मिनेटर’ (दिवस आणि रात्र यांना विभागणारी रेषा) बद्दल कमालीचे कुतूहल व्यक्त केले. तेथील प्रकाशाची बेटे आणि कृष्णविवरासारख्या दिसणार्‍या खोल दर्‍या पाहून ते थक्क झाले.

या ऐतिहासिक प्रवासादरम्यान अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागावर दोन नवीन विवरांचा शोध लावला. त्यांनी या विवरांना पुढील नावे देण्याची विनंती केली आहे ः 1. इंटेग्रिटी : अंतराळयानाच्या अधिकृत कॉल साईनवरून. 2. कॅरोल : कमांडर रीड वाईजमन यांच्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ. व्हिक्टर ग्लोव्हर, जेरेमी हॅन्सन, क्रिस्टीना कोच आणि रीड वाईजमन हे चंद्राची संपूर्ण ‘मागची बाजू’ पाहणारे इतिहासातील पहिले मानव ठरले आहेत, जे अपोलो मोहिमेदरम्यान शक्य झाले नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news