NASA moon experiment | चंद्रावर आग लावण्याच्या तयारीत ‘नासा’; अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल

NASA moon experiment  |
NASA moon experiment | चंद्रावर आग लावण्याच्या तयारीत ‘नासा’; अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अंतराळात फिरायला गेलेल्या अंतराळवीरांना अनेक धोके असतात; पण त्यातील सर्वात भयानक धोका म्हणजे 'आग.' पृथ्वीवर आग विझविणे सोपे असते; मात्र अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षणामध्ये (लो ग्रॅव्‍हिटी) आग अत्यंत विचित्र वागते. हेच रहस्य उलगडण्यासाठी ‘नासा’ या वर्षाच्या अखेरीस चंद्राच्या पृष्ठभागावर आग लावण्याचा पहिला ऐतिहासिक प्रयोग करणार आहे.

चंद्रावरच प्रयोग का?

पृथ्वीवर गरम हवा हलकी होऊन वर जाते आणि थंड हवा आगीच्या तळाशी येते, ज्यामुळे काहीवेळा आग आपोआप विझू शकते; पण चंद्रावर गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत केवळ १/६ (एक षष्ठांश) आहे. संशोधकांच्या मते, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण आग लागण्यासाठी 'नंदनवन' ठरू शकते. इथे आग पृथ्वीपेक्षा जास्त काळ जळू शकते आणि ती पसरण्याची पद्धतही वेगळी असते. पृथ्वीवर जे साहित्य जळत नाही, ते अंतराळातील वातावरणात तासन्‌तास जळत राहू शकते.

कसा असेल हा प्रयोग?

‘फ्लेमॅबिलिटी ऑफ मटेरिअल्स ऑन द मून' (FM) या नावाने हा प्रयोग राबवला जाईल. एका सीलबंद चेंबरमध्ये इंधनाचे चार नमुने चंद्रावर पाठवले जातील. तिथे हे नमुने पेटवले जातील आणि कॅमेरे व सेन्सरद्वारे ही आग कशी पसरते, ती किती ऑक्सिजन वापरते, याचे निरीक्षण केले जाईल. 'आर्टेमिस ४' या २०२८ च्या मानवी मोहिमेपूर्वी ही माहिती मिळवणे ‘नासा’साठी अत्यंत कठीण आहे.

भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वाचे

२०२८ मध्ये ‘नासा’ पुन्हा एकदा माणसाला चंद्रावर पाठवणार आहे. तिथे अंतराळवीर ज्या घरांमध्ये (Habitats) राहतील, तिथे ऑक्सिजनचा पुरवठा असेल. जर चुकून तिथे आग लागली, तर ती कशी विझवायची आणि कोणते साहित्य वापरणे सुरक्षित आहे, हे समजण्यासाठी हा प्रयोग 'लाईफ सेव्हर' ठरू शकतो.

२०५० पर्यंत चंद्रावर जन्मणार मुले?

या संशोधनासोबतच युरोपियन स्पेस एजन्सीच्या तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, २०३० पर्यंत चंद्रावर १० लोकांची पहिली वस्ती होईल आणि २०५० पर्यंत तिथे संपूर्ण कुटुंबे राहू शकतील. इतकेच नाही, तर काही दशकांत चंद्रावर मानवी मुलांचा जन्मही होऊ शकतो. चंद्रावर आग लावण्याचा हा प्रयोग वरवर धोकादायक वाटत असला, तरी मानवाच्या अंतराळ प्रवासाला सुरक्षित करण्यासाठी तो अत्यंत आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news