

नवी दिल्ली : चंद्रावर यशस्वीरीत्या उतरण्याचे एका जपानी खासगी कंपनीचे स्वप्न भंगले आहे. ‘आयस्पेस’ कंपनीचे ‘रेझिलियन्स’ नावाचे लँडर चंद्रावर उतरण्याच्या काही क्षण आधी कोसळले. या अपघाताला आता अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि भारताच्या इस्रोनेही दुजोरा दिला आहे. दोन्ही देशांच्या चंद्राभोवती फिरणार्या ऑर्बिटरनी अपघातग्रस्त लँडरचे फोटो काढले असून, त्यात लँडरचे अवशेष चंद्राच्या पृष्ठभागावर विखुरलेले स्पष्ट दिसत आहेत.
‘आयस्पेस’ या जपानच्या खासगी कंपनीने ‘रेझिलियन्स’ लँडर 5 जून रोजी चंद्राच्या उत्तर गोलार्धातील ‘मारे फ्रि गोरिस’ या भागात उतरवण्याचे नियोजन केले होते. या मोहिमेद्वारे अनेक वैज्ञानिक उपकरणे, युरोपचे पहिलेवहिले लुनार रोव्हर ‘टेनेशियस’ आणि ‘मूनहाऊस’ नावाची एक अनोखी कलाकृती चंद्रावर पोहोचवण्यात येणार होती. मात्र, लँडिंगच्या केवळ 100 सेकंद आधी लँडरचा पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि ते वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले.
या अपघातानंतर, 11 जून रोजी नासाच्या लुनार रेकॉनिसन्स ऑर्बिटरने ( ङठज) अपघातस्थळाचे फोटो काढले. या फोटोमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर एक गडद डाग दिसत होता, जो लँडरच्या आघातामुळे उडालेल्या धुळीमुळे आणि खडकांमुळे (रेगोलिथ) तयार झाला होता. त्यानंतर 16 जून रोजी, भारताच्या चांद्रयान-2 ऑर्बिटरने अधिक स्पष्ट आणि तपशीलवार फोटो काढले. या फोटोंच्या आधारे एका खगोलप्रेमी, षण्मुगा सुब्रमण्यम यांनी लँडरचे तब्बल 12 तुकडे ओळखले आणि त्याची माहिती सोशल मीडियावर दिली.
या घटनेमुळे खासगी कंपन्यांच्या चंद्रमोहिमांना एक मोठा धक्का बसला असला तरी, अंतराळ संशोधनातील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे एक उत्तम उदाहरणही पाहायला मिळाले. जपानच्या मोहिमेला अपघात झाल्यानंतर अमेरिका आणि भारताच्या अंतराळ संस्थांनी तातडीने मदत करत अपघाताची नेमकी स्थिती जगासमोर आणली. यावरून भविष्यातील अंतराळ मोहिमा किती आव्हानात्मक आहेत आणि त्यासाठी जागतिक सहकार्य किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.