‘नासा’ने शोधला हिर्‍यांनी संपन्न असलेला बाह्यग्रह

पृथ्वीहून पाचपट मोठा असणारा हा ग्रह संपूर्णरीत्या हिर्‍यांनी भरलेला
NASA exoplanet discovery
‘नासा’ने शोधला हिर्‍यांनी संपन्न असलेला बाह्यग्रह
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः ‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप या अंतराळ दुर्बिणीने लाँच झाल्यापासूनच अनेक नवे शोध लावले आहेत. आता या दुर्बिणीने एक वैशिष्ट्यपूर्ण असा बाह्यग्रह शोधला आहे. हा ग्रह हिर्‍यांनी अक्षरशः भरलेला आहे! या ग्रहाबाबत बरेच संशोधन करण्यात आले असून पृथ्वीहून पाचपट मोठा असणारा हा ग्रह संपूर्णरीत्या हिर्‍यांनी भरलेला असू शकतो, असा निष्कर्ष या शोधातून लावला जात आहे. शास्त्रज्ञांनी या ग्रहाला ‘55 कॅन्क्री ई’ असं नाव दिलं असून तो पृथ्वीपासून 41 प्रकाशवर्षे दूर असल्याचं सांगण्यात येत आहे.

या संशोधनामुळं खगोलीय क्षेत्रात काही नव्या संकल्पना आणि संभावनांना वाव मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. ‘55 कॅन्क्री ई’ या ग्रहाला सध्या ‘सुपर अर्थ’ या श्रेणीत ठेवण्यात आलं असून त्याचा आकार पृथ्वीहून पाचपट असल्याचं सांगण्यात येतं. या ग्रहाचा एक मोठा भाग हिरे आणि ग्राफाईट यांसारख्या कार्बन संरचनांपासून तयार झाला असून, या संशोधनामुळं पारंपरिक ग्रह रचना आणि ब—ह्मांडातील विविधतेसंदर्भात अनेक गोष्टी लक्षात येत आहेत. नव्यानं शोध लागलेल्या या ग्रहाचं तापमान प्रचंड असून, तो आपल्या तार्‍यापासून अतिशय जवळ असल्यानं 17 तासांमध्ये आपल्या एका कक्षेतील परिक्रमा पूर्ण करतो. ज्यामुळं या ग्रहाचं तापमान 2400 अंश सेल्सिअस इतकं सांगण्यात येतं. इतक्या भीषण उष्णतेमध्ये जीवसृष्टीची शक्यता धूसर किंबहुना नसल्याचेच स्पष्ट होतं, असं संशोधकांचं निरीक्षण. या ग्रहावर असणारं वातावरण पूर्णपणे वेगळं असून शास्त्रज्ञांनी त्याच्या चारही बाजूंनी एका विशिष्ट वातावरणाची अर्थात ‘सेकंडरी अ‍ॅटमॉस्फिअर’च्या अस्तित्वाची शक्यताही वर्तवली आहे. या स्थितीमुळं ज्वालामुखीय क्रियेला वाव मिळतो, असंही सांगण्यात येत आहे. दुसर्‍या एका अहवालानुसार आता शास्त्रज्ञ या ग्रहाच्या खोलीचा अभ्यास करत त्या माध्यमातून ब—ह्मांडात आणखी असे नेमके किती ग्रह अस्तित्वात आहेत याचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news