

वॉशिंग्टन : अंतरिक्ष क्षेत्रातून एक अत्यंत थक्क करणारी बातमी समोर आली आहे. अब्जाधीश एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीचे एक शक्तिशाली रॉकेट अनियंत्रित होऊन थेट चंद्राच्या पृष्ठभागावर काही दिवसांपूर्वीच आदळले होते. या भीषण धडकेमुळे चंद्रावर ६० फूट रुंद आणि प्रचंड खोल खड्डा (क्रेटर) तयार झाला आहे. अमेरिकेची अंतरिक्ष संस्था ‘नासा’च्या एका शक्तिशाली सॅटेलाईटने ही जागा शोधून काढली असून, या घटनेची अत्यंत स्पष्ट आणि थक्क करणारी छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
ही संपूर्ण घटना ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन ९’ या रॉकेटशी संबंधित आहे, ज्याचे प्रक्षेपण १५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले होते. दोन व्यापारी लूनार लँडर्सना चंद्राच्या दिशेने पाठवणे हे या रॉकेटचे काम होते. प्रक्षेपणानंतर रॉकेटचा पहिला भाग म्हणजे ‘बूस्टर’ सुरक्षितपणे पृथ्वीवर परतला; परंतु त्याचा दुसरा (वरचा) भाग लँडर्सना चंद्राच्या दिशेने ढकलत राहिला. मिशन पूर्ण झाल्यानंतर नियमांनुसार कंपनीने हा भाग अंतराळातच सोडून दिला. मात्र, अंतराळातील जटिल कक्षीय गतिशीलतेमुळे हा बूस्टर भरकटला. हळूहळू तो चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात अडकला आणि ५ ऑगस्ट रोजी अत्यंत वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळला.
रॉकेट चंद्रावर आदळल्याची बातमी पक्की होताच जगभरातील अंतराळ संस्था अलर्ट मोडवर आल्या. सर्वप्रथम चिली येथील युरोपियन साउदर्न ऑब्झर्व्हेटरीच्या ‘व्हेरी लार्ज टेलिस्कोप’ने ही धडक डिटेक्ट केली. यानंतर लगेचच दक्षिण कोरियाच्या ‘पाथफाईंडर लूनर ऑर्बिटर’ने या घटनेचा सुरुवातीचा डेटा आणि छायाचित्रे शेअर केली. त्यानंतर ‘नासा’ने कोरिया एरोस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन सोबत हातमिळवणी करत ‘दानुरी’ सॅटेलाईटकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या विशेष मोहिमेची आखणी केली. नासाने आपल्या ‘लूनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर’ मध्ये बसवलेल्या नॅरो-ॲंगल कॅमेऱ्याच्या मदतीने ही जागा स्कॅन करण्यास सुरुवात केली. हे सॅटेलाईट चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ६० मैल उंचावरून दर सेकंदाला १ मैल या वेगाने प्रवास करत होते.
नासाच्या अभियंत्यांनी या सॅटेलाईटला थोडे झुकवले, जेणेकरून त्याचे कॅमेरे थेट त्या नव्या खड्ड्याकडे पाहू शकतील. नासाच्या वैज्ञानिकांसाठी हे छायाचित्र टिपणे अजिबात सोपे नव्हते. ऑर्बिटरचा मार्ग आणि धडक झालेली जागा एका रेषेत येण्यासाठी तब्बल सहा दिवसांचा वेळ लागला. या क्रेटरचा फोटो घेण्यासाठी अत्यंत अचूकतेची गरज होती. कॅमेऱ्याने फोटो क्लिक करण्यास अवघा १० सेकंदांचाही उशीर झाला असता, तर चंद्राच्या फिरण्यामुळे तो नवीन खड्डा कॅमेऱ्याच्या फ्रेमपासून तब्बल १० मैल दूर निघून गेला असता. अथक परिश्रम आणि डेटा प्रोसेसिंगनंतर नासा मंगळवारी या ६० फूट रुंद खड्ड्याची अत्यंत स्पष्ट छायाचित्रे जगासमोर आणण्यात यशस्वी झाली.