Artemis 2 mission | ‘नासा’च्या ‘आर्टेमिस-2’ने सोडली पृथ्वीची कक्षा

चंद्राच्या दिशेने घेतली झेप
Artemis 2 mission
Artemis 2 mission | ‘नासा’च्या ‘आर्टेमिस-2’ने सोडली पृथ्वीची कक्षा
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः ‘नासा’ची महत्त्वाकांक्षी ‘आर्टेमिस-2’ मोहीम बुधवारी (भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे) फ्लोरिडाच्या स्पेस कोस्टवरून स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6.35 वाजता यशस्वीरीत्या प्रक्षेपित झाली. मात्र, मोहिमेतील सर्वात निर्णायक टप्पा गुरुवारी पार पडला, जेव्हा अंतराळयानाने ‘ट्रान्सलूनर इंजेक्शन बर्न’ प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्रियेमुळे अंतराळयान पृथ्वीची कक्षा सोडून खोल अंतराळात झेपावले असून, येत्या चार दिवसांत ते चंद्राच्या समीप पोहोचणार आहे.

‘नासा’च्या अधिकृत माहितीनुसार, या प्रक्रियेमुळे ‘ओरियन’ अंतराळयान चंद्राच्या मार्गावर मार्गस्थ झाले आहे. ही प्रक्रिया केवळ चंद्राकडे जाण्यासाठीच नाही, तर अंतराळवीरांना सुरक्षितपणे पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘फ्री-रिटर्न ट्रॅजेक्टोरी’साठीदेखील अत्यंत महत्त्वाची आहे. मोहिमेला केवळ दोन दिवस झाले असले, तरी या प्रक्रियेमुळे एक प्रकारे ओरियनचा पृथ्वीवर परतण्याचा मार्गही निश्चित झाला आहे. कोणत्याही चंद्र मोहिमेसाठी ‘ट्रान्सलूनर इंजेक्शन बर्न’ हा अखेरचा महत्त्वाचा टप्पा असतो. जोपर्यंत अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत असतात, तोपर्यंत काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांना परत आणणे सोपे असते.

एकदा का यानाने पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा सोडली की, मग चंद्राला वळसा घालूनच परत येणे शक्य असते. ‘नासा’च्या चमूने सर्व तपासणीअंती हिरवा कंदील दाखवल्यानंतर, 7.49 वाजता ही प्रक्रिया पार पडली. एकूण 5 मिनिटे 50 सेकंद चाललेल्या या प्रक्रियेत ओरियन यानाने प्रचंड वेग धारण केला. ‘नासा’च्या मते, ओरियनकडे 6,000 पाऊंड इतका थ—स्ट (जोर) आहे, जो एका कारला अवघ्या 2.7 सेकंदात ताशी 60 मैल वेग देण्यास सक्षम आहे. कॅनडियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर जेरेमी हॅन्सन यांनी या यशानंतर आनंद व्यक्त करताना सांगितले की, ‘या प्रक्रियेच्या प्रत्येक सेकंदाला आम्हाला तुमच्या जिद्दीची आणि परिश्रमांची प्रचिती येत होती.

’ तर मोहिमेतील अंतराळवीर क्रिस्टिना कोच यांनी प्रक्रियेपूर्वी भावुक होत म्हटले की, ‘चंद्राच्या दिशेने या प्रवासाला निघताना आपण पृथ्वीला सोडून जात नाही आहोत, तर आपण तिची (भविष्यासाठी) निवड करत आहोत.’ ‘आर्टेमिस-2’ ही दहा दिवसांची चाचणी मोहीम आहे. याद्वारे ‘नासा’ हे सिद्ध करणार आहे की, मानवाला पुन्हा सुरक्षितपणे खोल अंतराळात पाठवता येते. या मोहिमेच्या यशावरच भविष्यातील मोहिमांचे नियोजन अवलंबून असेल, ज्यांतर्गत 2028 पर्यंत मानवाला पुन्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news