

वॉशिंग्टन : केक, मोठमोठे बुके, चॉकलेटस् आणि घरात कधी छोटेखानी तर कधी थाटामाटातील वाढदिवस बहुतांशी घराघरात साजरे केले जातात. अबालवृद्धांसह कोणतीही वयोमर्यादा याला नाही. ‘नासा’च्या सर्वात ज्येष्ठ अंतराळवीराचा मात्र 70 वा वाढदिवस यापेक्षाही खास पद्धतीने साजरा झाला असून, सध्या सोशल मीडियावर याची चर्चा रंगते आहे. डॉन पेट्टिट असे या 70 वर्षीय अंतराळवीराचे नाव असून, तब्बल 7 महिने अंतराळात राहिल्यानंतर वाढदिनीच पृथ्वीवर परतत त्यांनी आपला यंदाचा वाढदिवस आणखी कशापेक्षाही अधिक थाटामाटात साजरा केला. एक अमेरिकन व दोन रशियन अशा तीन अंतराळवीरांना घेऊन येणारे सोयूझ कॅप्सूल रविवारी कझाकस्थानात सुरक्षितरीत्या उतरले, त्यावेळी यात डॉन पेट्टिट यांचाही समावेश होता.
डॉन पेट्टिट यांनी अंतराळात 220 दिवस व्यतित करत संशोधन केले. यावेळी त्यांच्यासमवेत अॅलेक्सेई ओव्हचेनिन व इव्हान व्हॅग्नेर या सहकार्यांचाही समावेश राहिला. यादरम्यान त्यांनी पृथ्वीला 3,520 वेळा प्रदक्षिणा घातली. पेट्टिट यांच्यासाठी ही आजवरची एकूण चौथी अंतराळ यात्रा होती. आपल्या 29 वर्षांच्या सेवेत त्यांनी तब्बल 18 महिने अंतराळात व्यतित केले आणि 93.3 दशलक्ष मैलांचा प्रवास पूर्ण केला. रविवारी सकाळी त्यांच्या पॅराशूटने 6 वाजून 5 मिनिटांनी सूर्यकिरणांच्या साक्षीने कझाकस्तानमधील एका सुरक्षित ठिकाणी सुखरूप लँडिंग केले. कॅप्सूलमधून बाहेर पडताच तिन्ही अंतराळवीरांनी उपस्थितांना अभिवादन केले. टेक्सासमधील जॉन्सन स्पेस सेंटरला भेट दिल्यानंतर तेथून ते कझाकमधील शहराकडे रवाना होणार होते.
या तिन्ही अंतराळवीरांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सहा महिन्यांच्या कालावधीत अनेक बाबतीत सखोल संशोधन केले. त्यांच्या सात महिन्यांच्या या मोहिमेदरम्यान त्यांनी पाण्याच्या स्वच्छतेसाठी तंत्रज्ञान, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वनस्पतींची वाढ आणि मायक्रो गॅव्हिटीमध्ये आगीचे वर्तन यासारख्या अनेक संशोधन प्रकल्पांवर काम केले.