

वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाकडून सातत्याने काही महत्त्वाच्या संशोधनांसंदर्भातील निरीक्षणं अहवालांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतात. अशीच अतिशय महत्त्वाची माहिती नासानं पुन्हा एकदा जगासमोर आणली आहे. ‘नासा’च्या TESS नावाच्या उपग्रहानं ही महत्त्वाची माहिती टीपत नव्या संशोधनानं अनेकांचेच डोळे विस्फारले आहेत. उपलब्ध माहितीनुसार नासानं टिपलेला हा लाल रंगाचा तारा Gaia BH2 नावाच्या विश्वाचा एक भाग असून, तो सर्वप्रथम 2023 मध्ये युरोपीय अवकाश संशोधन संस्थेनं शोधला होता. Gaia मोहिमेदरम्यान या तार्याचा उलगडा झाला होता. Gaia BH2 हे एक अजब विश्व असून, हा एक डॉरमेंच ब्लॅकहोल आहे, जो सध्यातरी आजूबाजूच्या तार्याकडून कोणतीही गोष्ट स्वत:कडे आकर्षित करत नाही. ज्यामुळं या रचनेतून एक्स-रे सारखी वेगवान किरणंही उत्सर्जित होत नाहीत. या कृष्णविवराजवळ असलेल्या लाल तार्यामध्ये पृथ्वीवरील भूकंपासारखे ‘स्टारक्वेक’ होत आहेत.
संशोधकांच्या निरीक्षणानुसार लाल रंगाचा हा तारा त्याच्या ऊर्जेमध्ये चढ-उतार करताना दिसत असून त्याचा प्रकाशही कमीजास्त होत आहे, या स्थितीला शास्त्रीय भाषेत ‘स्टारक्वेक’ असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे पृथ्वीवर भूकंप होतात, त्याचप्रमाणे स्टारक्वेकमुळं तार्यांच्या अंतर्गत भागातील हालचाली लक्षात येतात. हवाई विश्वविद्यालयातील इन्स्टिट्यूट फॉर एस्ट्रोनॉमीच्या संशोधकांनी या कंपनांच्या मदतीनं तार्यांच्या अंतर्गत भागाचं अध्ययन केलं. या तार्यांमध्ये वजनानं अधिक घटकांचं प्रमाण मोठं असून, असे घटक अनेक जुन्या तार्यांमध्ये आढळतात.
ज्यामुळं प्रारंभी हा तारा फार जुना असेल असा निष्कर्ष लावला गेला. मात्र स्ट्रारक्वेकनं हा समज मोडीत काढला. संशोधकांच्या मते, या तार्याचं वय जवळपास 5 अब्ज वर्षे इतकं असून, ब—ह्मांडाच्या तुलनेत हे वय फारसं नाही. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हा तारा अतिशय वेगानं फिरत तो 398 दिवसांत एक फेरी पूर्ण करतो. लाल विशाल तार्यांसाठी ही गती असामान्य असून, संशोधकांच्या मते, हा वेग तार्याला आपोआप मिळालेला नाही.
हा तारा सुरुवातीच्या कालखंडात कोणा एका दुसर्या तार्यावर आदळून त्याच्याशी एकरूप झाल्यानं हा वेग वाढलेला असू शकतो. तार्याची वैशिष्ट्य पाहता संशोधकांनी त्याची तुलना एका Gaia BH3 नावाच्या शांत ब्लॅक होलशी केली, जिथं तार्यांमध्ये कोणतीही कंपनं आढळली नाहीत. दरम्यान, या राक्षसी तार्यासंदर्भात आता संशोधक अधिक माहिती मिळवण्याच्या प्रयत्नांत असून, त्यातून कोणता उलगडा होणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल.