Europa spider patterns | गुरूचा चंद्र ‘युरोपा’ वरील ‘कोळ्या’चे उलगडले रहस्य

Europa spider patterns
Europa spider patterns | गुरूचा चंद्र ‘युरोपा’ वरील ‘कोळ्या’चे उलगडले रहस्यFile Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह गुरूचा चौथा सर्वात मोठा चंद्र असलेल्या ‘युरोपा’वर गेल्या 30 वर्षांपासून शास्त्रज्ञांना कोड्यात टाकणार्‍या एका कोळीसद़ृश रचनेचे रहस्य अखेर उलगडले आहे. या विचित्र आकृतीला आता ‘दामन एल्ला’ असे नाव देण्यात आले असून, आयरिश भाषेत याचा अर्थ ‘कोळी’ किंवा ‘भिंतीवरील राक्षस’ असा होतो.

मार्च 1998 मध्ये नासाच्या ‘गॅलिलिओ’ अंतराळयानाने युरोपाच्या पृष्ठभागाचे फोटो टिपले होते. यामध्ये ‘मन्नान क्रेटर’ नावाच्या एका विवराच्या मध्यभागी झाडाच्या फांद्यांसारखा किंवा कोळ्याच्या जाळ्यासारखा एक गडद आकार दिसला होता. सुमारे 13.7 मैल (22 कि.मी.) रुंद असलेल्या या संरचनेबद्दल शास्त्रज्ञांमध्ये अनेक दशकांपासून मतभेद होते. सुरुवातीला हा आकार गुरू ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे पडलेल्या भेगा असाव्यात किंवा युरोपाच्या गर्भातील महासागरातून होणार्‍या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झाला असावा, असे मानले जात होते.

‘द प्लॅनेटरी सायन्स जर्नल’ मध्ये 2 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अभ्यासात शास्त्रज्ञांनी वेगळाच दावा केला आहे. संशोधकांच्या मते, ही रचना पृथ्वीवरील गोठलेल्या तलावांवर तयार होणार्‍या ‘लेक स्टार्स’ प्रमाणे तयार झाली असावी. पृथ्वीवर जेव्हा गोठलेल्या तलावावर बर्फ पडतो, तेव्हा बर्फाच्या थरातील छोट्या छिद्रांमधून पाणी वर येते आणि अशा नक्षीदार आकृत्या तयार होतात. संशोधकांनी प्रयोगशाळेत ही प्रक्रिया पुन्हा करून पाहिली आणि त्यांना युरोपावरील आकृतीशी जुळणारे निकाल मिळाले.

शास्त्रज्ञांच्या मते, ही प्रक्रिया खालील टप्प्यांत घडली असावी : युरोपाच्या पृष्ठभागावर मन्नान क्रेटर तयार झाल्यानंतर, तिथे एखाद्या मोठ्या लघुग्रहाचा आघात झाला असावा. या आघातामुळे चंद्राच्या बर्फाळ कवचाला एक बारीक तडा गेला. या तड्यावाटे युरोपाच्या अंतरंगातील खारट पाणी वर आले आणि पृष्ठभागावर पसरले. हे पाणी गोठताना त्यातून कोळीसद़ृश ‘दामन एल्ला’ची निर्मिती झाली. युरोपा हा चंद्र सौरमालेतील अशा ठिकाणांपैकी एक मानला जातो, जिथे परग्रहीय जीवसृष्टी असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. या नवीन शोधामुळे तेथील भूगर्भीय घडामोडी समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news