

कैरो : प्राचीन इजिप्तचा तीन हजार वर्षांपूर्वीचा प्रसिद्ध योद्धा शासक, फेरो रॅमसेस दुसरा, त्याच्या लष्करी विजयांसाठी आणि भव्य सार्वजनिक कामांसाठी ओळखला जातो. त्याने सुमारे 66 वर्षे (अंदाजे इ.स. पूर्व 1279 ते 1213) ‘न्यू किंगडम’ काळात इजिप्तवर राज्य केले आणि वयाच्या 90 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला, जे त्या काळासाठी आश्चर्यकारक वय होते; पण रॅमसेस द्वितीयचा मृत्यू कसा झाला आणि या महान फेरोच्या मृत्यूनंतर काय घडले? याबाबत संशोधकांना कुतूहल आहे.
सुरुवातीला, रॅमसेस द्वितीयच्या राज्यारोहणाबद्दल जाणून घेऊया. त्याचे वडील सेटी पहिला (राज्यकाळ अंदाजे इ.स. पूर्व 1294 ते 1279) यांच्या मृत्यूनंतर तो फेरो बनला. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, रॅमसेस दुसरा अनाटोलिया (सध्याचे तुर्कस्तान) येथील हिटाईट राज्याशी युद्धात गुंतला होता. त्याने त्यांच्याविरुद्ध इ.स. पूर्व 1275 च्या सुमारास सध्याच्या सीरियामध्ये एक मोठी लढाई लढली, जी आता ‘कादेशची लढाई’ म्हणून ओळखली जाते. रॅमसेसने या लढाईत विजय मिळवल्याचा दावा केला असला, तरी आधुनिक इतिहासकारांच्या मते दोन्हीपैकी कोणत्याही पक्षाला निर्णायक विजय मिळाला नव्हता.
पुढे, इ.स. पूर्व 1258 च्या सुमारास रॅमसेसने हिटाईट लोकांशी शांतता करार केला आणि एका हिटाईट राजकन्येला आपल्या पत्नींपैकी एक म्हणून स्वीकारले. इतर इजिप्शियन फेरोंप्रमाणे, तो बहुपत्नीवादी होता आणि त्याला अनेक पत्नी व उपपत्नी होत्या. केंब्रिज विद्यापीठातील इजिप्तशास्त्रज्ञ टोबी विल्किन्सन यांनी त्यांच्या ‘रॅमसेस द ग्रेट : इजिप्तस् किंग ऑफ किंग्स’ (येल युनिव्हर्सिटी प्रेस, 2023) या पुस्तकात अंदाजे म्हटले आहे की, त्याला सुमारे 100 मुले होती. या फेरोने नाईल नदीच्या पूर्वेकडील खोर्यामध्ये सध्याच्या कांतीर गावाजवळ ‘पाय-रॅमसेस’ (पेर-रॅमसेस नावानेही ओळखले जाते) नावाची नवीन राजधानी वसवली.
विल्किन्सन यांनी लिहिले आहे की, ‘संपूर्ण शहरावर त्याच्या फेरो संस्थापकाचा स्पष्ट ठसा होता. त्यांनी नमूद केले की, शहरात रॅमसेस दुसर्याचे किमान 50 भव्य पुतळे होते, त्यापैकी बहुतेक त्याच्या हयातीत बांधले गेले होते. रॅमसेस द्वितीयचा मृत्यू झाल्यावर, त्याला ‘राजांच्या दरी’तील (Valley of the Kings) एका कबरीत दफन करण्यात आले. ही कबर लुटल्यानंतर, त्याची ममी इतर राजघराण्यातील ममींसोबत देर अल-बहारी येथील एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आली. सध्या त्याची ममी कैरो येथील ‘नॅशनल म्युझियम ऑफ इजिप्शियन सिव्हिलायझेशन’मध्ये आहे. रॅमसेस द्वितीयच्या ममीच्या विश्लेषणातून त्याच्या मृत्यूच्या कारणांवर प्रकाश पडला आहे.
कैरो विद्यापीठातील रेडिओलॉजीच्या प्राध्यापिका आणि रॅमसेस दुसर्याच्या ममीचा सखोल अभ्यास करणार्या डॉ. सहार सलीम यांनी सांगितले की, ‘रॅमसेस दुसरा आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक वर्षे संधिवाताने त्रस्त असावा आणि पाठीला बाक येऊन चालत असावा. त्याला दातांचे गंभीर आजारही होते, ज्यामुळे त्याला दीर्घकाळ वेदना किंवा संसर्ग झाला असावा. तथापि, सीटी स्कॅनमध्ये मृत्यूचे कोणतेही निश्चित कारण ओळखता आले नाही. ‘डॉ. सलीम यांच्या मते, त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असावा. रॅमसेस दुसरा सुमारे 90 वर्षे जगला, ही प्राचीन इजिप्तमध्ये एक मोठी उपलब्धी होती. त्याचा तेरावा मुलगा, मेरनेप्टाह, त्याच्यानंतर फेरो बनला. थॉमस यांनी नमूद केले की, मेरनेप्टाह फेरो बनताना सिंहासनासाठी कोणताही संघर्ष झाल्याचा कोणताही पुरावा नाही.