

रिओ डी जानेरिओ : अंतराळातून काढलेल्या एका उपग्रह छायाचित्रात मध्य ब्राझीलमध्ये एक अवाढव्य, ‘स्पाँज’सारखा (पाणी शोषून घेणारा) घुमट उठून दिसतो. हा गडद रंगाचा विशाल दगडी भाग आणि त्यावर पसरलेली दुर्मीळ जैवविविधता या भागातील प्रसिद्ध उष्ण पाण्याचा कारंज्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
नासाच्या ‘अर्थ ऑब्झर्व्हेटरी’नुसार, लंबगोलाकार आकाराची ही भव्य रचना सुमारे २० किलोमीटर (१२ मैल) लांब आणि १२ किलोमीटर (७ मैल) रुंद असून तिला ‘काल्डास नोव्हाज डोम’ किंवा ‘सेरा दे काल्डास’ म्हणून ओळखले जाते. ही टेकडी आग्नेय गोइआस राज्यात असून आसपासच्या जमिनीपासून तब्बल १,००० फूट (३०० मीटर) उंच आहे. (जरी प्रकाशाच्या प्रभावामुळे काही लोकांना छायाचित्रात ही उंचावलेली जागा एखाद्या पसरट दरीसारखी दिसू शकते.) २००४ च्या एका अभ्यासानुसार, हा विशाल दगडी घुमट किमान ६० कोटी वर्षे जुना असण्याचा अंदाज आहे. याला ‘काल्डास नोव्हाज’ शहरावरून हे नाव मिळाले आहे.
उपग्रह छायाचित्रात हे शहर गडद हिरव्या रंगाचा घुमट आणि शेजारील जलविद्युत प्रकल्पाच्या ‘कोरुम्बा’ या कृत्रिम तलावाच्या मध्ये वसलेले दिसते. या शहराची लोकसंख्या सुमारे १ लाख असली तरी, येथील प्रसिद्ध उष्ण पाण्याच्या कारंज्यांमध्ये आंघोळ करण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. हा घुमट ‘सेराडो’ नावाच्या सव्हाना गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे. हा प्रदेश ब्राझीलचा सुमारे एक चतुर्थांश भाग व्यापतो. ॲमेझॉनसारख्या पर्जन्यवनांनंतर दक्षिण अमेरिकेतील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जैवविविधता आहे. ही एक उष्णकटिबंधीय सव्हाना प्रणाली आहे, जी सामान्य गवताळ प्रदेशांपेक्षा कितीतरी पटीने अधिक पर्यावरणीय विविधता जपणारी आहे. झाडे, गवताळ जमीन आणि दलदलीच्या प्रदेशाचे हे एक अद्वितीय मिश्रण मानले जाते.
‘सेराडो’ हा भाग पावसाचे पाणी अत्यंत वेगाने शोषून घेतो, ज्यामुळे हा विशाल घुमट एखाद्या मोठ्या ‘स्पाँज’सारखा कार्य करतो. शोषलेले हे पाणी या दगडी रचनेच्या अंतर्गत भागातून खाली पाझरून भूगर्भातील पाण्याच्या साठ्यांमध्ये जमा होते. नासाच्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीनुसार, या साठ्यांमुळेच कोरड्या ऋतूतही जवळच्या उष्ण कारंज्यांना सातत्याने कोमट व उष्ण पाण्याचा पुरवठा होत राहतो. भूगर्भातील पाणी पुनर्भरण करण्याच्या आणि देशातील प्रमुख नद्यांना पाणी पुरवण्याच्या या महत्त्वाच्या भूमिकेमुळे ‘सेराडो’ला ब्राझीलमध्ये ‘पाण्याचे पाळणाघर’ असेही म्हटले जाते. तसेच, या घुमटाच्या कडांवर असणाऱ्या अनेक निसर्गरम्य धबधब्यांचे पोषण करण्यातही याचा मोठा वाटा आहे.