Mysterious red dots in space | अंतराळातील ‘त्या’ गूढ लाल ठिपक्यांचे रहस्य उलगडले?

Mysterious red dots in space
Mysterious red dots in space | अंतराळातील ‘त्या’ गूढ लाल ठिपक्यांचे रहस्य उलगडले?File photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अथांग अवकाशात दिसणार्‍या काही अत्यंत अनाकलनीय वस्तूंबाबत शास्त्रज्ञांनी आता एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला आहे. ‘लिटिल रेड डॉटस्’ (लहान लाल ठिपके) म्हणून ओळखल्या जाणार्‍या या गूढ खगोलीय वस्तू नेमक्या काय आहेत, याचे उत्तर कदाचित संशोधकांना सापडले आहे.

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने 2022 मध्ये काम सुरू केल्यानंतर अवकाशात हे गूढ लाल ठिपके पहिल्यांदा दिसले होते. हे ठिपके विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील आहेत. सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटले की, हे तार्‍यांनी भरलेली छोटी ‘गॅलेक्सी’ (आकाशगंगा) असावी, पण विश्वाच्या इतक्या सुरुवातीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात तारे तयार होणे सध्याच्या सिद्धांतानुसार अशक्य होते. ‘नेचर’ या नियतकालिकात बुधवार, 14 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, हे लाल ठिपके म्हणजे प्रत्यक्षात ‘तरुण महाकाय कृष्णविवरे’ असू शकतात. ही कृष्णविवरे गॅसच्या (वायूंच्या) अतिशय दाट ढगांमध्ये वेढलेले आहेत.

या ढगांमुळेच त्यांच्या खर्‍या स्वरूपाचे संकेत मिळत नव्हते. या ठिपक्यांच्या भोवतालच्या हायड्रोजन अणूंच्या हालचालीवरून असे लक्षात आले आहे की, तिथला वायू हजारो मैल प्रति सेकंद वेगाने फिरत आहे. केंद्रातील वस्तूच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळेच हा वेग प्राप्त झाला असावा. साओ पाउलो विद्यापीठातील खगोल-भौतिक शास्त्रज्ञ रॉड्रिगो नेमेन यांच्या मते, हा वेग म्हणजे तिथे एक ‘सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्लियस’ असल्याचे स्पष्ट लक्षण आहे. म्हणजेच, एक महाकाय कृष्णविवर जो सभोवतालचे द्रव्य स्वतःकडे खेचून घेत आहे.

हे रहस्य पूर्णपणे सुटले आहे असे म्हणता येणार नाही, कारण काही गोष्टी अजूनही वैज्ञानिकांना गोंधळात टाकत आहेत. 1. क्ष-किरणांचा अभाव : सामान्यतः महाकाय कृष्णविवरे क्ष-किरण किंवा रेडिओ लहरी उत्सर्जित करतात; मात्र या लाल ठिपक्यांच्या बाबतीत तसे दिसून आलेले नाही. 2. अतिप्रचंड वस्तुमान : हे ठिपके गॅलेक्सी असोत वा कृष्णविवर, विश्वाच्या निर्मितीनंतर इतक्या कमी काळात त्यांचे वस्तुमान इतके जास्त कसे झाले, हे कोडे अजूनही सुटलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news