जोरदार वार करून कवचही फोडणार्‍या मँटिस श्रिंपचे उलगडले रहस्य

स्वतःच्या शरीराच्या शक्तीने सर्वात प्रबळ वार करणारा जीव
mystery-of-mantis-shrimp-powerful-strike-uncovered
जोरदार वार करून कवचही फोडणार्‍या मँटिस श्रिंपचे उलगडले रहस्यPudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : जगातील सर्वात ताकदवान जीवांपैकी एक मानला जाणारा मँटिस श्रिंप त्याच्या जोरदार फटक्याने शेल (कवच) सहज फोडू शकतो. मात्र, त्याच्या स्वतःच्या या विनाशकारी वाराचा खुद्द त्याच्यावर परिणाम होत नाही, हे वैज्ञानिकांसाठी मोठे कोडे होते. आता संशोधकांनी या रहस्याचा उलगडा केला आहे. हे श्रिंप त्यांच्या शरीरावर असलेल्या विशेष ‘शॉक-शिल्ड’च्या मदतीने स्वतःचे संरक्षण करतात.

पीकॉक मँटिस श्रिंप ( Odontodactylus scyllarus) हा स्वतःच्या शरीराच्या शक्तीने सर्वात प्रबळ वार करणारा जीव आहे. त्याच्या हातोड्यासारख्या पंज्यांचा वापर करून तो आपल्या भक्ष्याचे कवच सहज फोडतो. त्याचा वार इतका शक्तिशाली असतो की, तो अ‍ॅक्वेरियमची काचसुद्धा फोडू शकतो. वैज्ञानिकांच्या मते, हा आघात .22 कॅलिबर बुलेटच्या शक्तीइतका असतो. मात्र, या ताकदवान वारामुळे निर्माण होणार्‍या तीव्र कंपनांमुळे श्रिंप स्वतःच जखमी का होत नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक अनेक वर्षांपासून करत होते. ‘सायन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात संशोधकांनी या श्रिंपच्या ‘डॅक्टिल क्लब्स’ची सूक्ष्म संरचना तपासली. त्यातून असे आढळले की, या क्लब्समध्ये असलेल्या विशेष संरचनांमुळे हा जीव स्वतःचे संरक्षण करू शकतो. ‘आम्ही शोधून काढले की, हा श्रिंप फोनॉनिक मेकॅनिझम्सचा वापर करतो. या संरचना ठरावीक प्रमाणात स्ट्रेस वेव्हज (दबावाच्या लहरी) नियंत्रित करून त्याचा नाश होण्यापासून बचाव करतात,’ असे नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सहलेखक होरासिओ डांटे एस्पिनोसा यांनी सांगितले. या श्रिंपचे डॅक्टिल क्लब्स एक अत्यंत जटिल स्प्रिंग आणि लॅचिंग सिस्टमचा वापर करून एका सेकंदात 75 फूट (23 मीटर) वेगाने वार करतात. 2004 च्या अभ्यासानुसार, हा वेग मानवी डोळ्याच्या पापणी लवण्याच्या वेगापेक्षा 50 पट जास्त आहे. हा प्रचंड वेग शक्तिशाली प्रहार करण्यास मदत करतो; पण त्याच वेळी मोठ्या प्रमाणावर धक्क्याच्या लहरी (shock waves) निर्माण करतो; मात्र मँटिस श्रिंपची खास संरचना या लहरी शोषून घेते, ज्यामुळे तो वार वारंवार करू शकतो आणि तरीही अखंड राहतो. हा शोध जैवसंरचनाशास्त्र (biomechanics) आणि अभियांत्रिकीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कारण, यावर आधारित नवीन शॉकअब्जॉर्बिंग सामग्री विकसित करता येऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news