

टोकियो : जपानमध्ये ३० वर्षांहून अधिक काळापूर्वी सापडलेले दुर्मीळ सांगाडे एका नवीन प्रजातीच्या ‘चिलखती डायनासोर’चे असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. या डायनासोरच्या पूर्वजांनी सुमारे १० कोटी वर्षांपूर्वी एका भू-सेतूचा (Land Bridge) वापर करून उत्तर अमेरिकेतून आशिया खंडात स्थलांतर केले असावे, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
‘नोडोसॉरिड’ वर्गात मोडणारा हा नव्याने नामकरण करण्यात आलेला डायनासोर आशियामध्ये आढळलेल्या अशा प्रकारच्या अवघ्या तीन प्रजातींपैकी एक आहे. आशियामध्ये नोडोसॉरिड प्रजातीचे सांगाडे दुर्मीळ आहेत. तसेच, जपानमध्ये सापडलेला हा डायनासोर शारीरिक रचनेच्या दृष्टीने उत्तर अमेरिकेत सापडलेल्या डायनासोरशी खूप साम्य दर्शवतो. त्यावरून संशोधकांनी असा अंदाज बांधला आहे की, या प्रजातीचे पूर्वज सध्याचा अलास्का आणि रशियाचा भाग जोडणाऱ्या प्राचीन ‘बेरिंग लँड ब्रिज’वरून प्रवास करून आशियात आले असावेत. ‘क्रिटेशिअस रिसर्च’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
या संशोधनावर बोलताना कॅनडातील ‘रॉयल बी. सी. म्युझियम’च्या संशोधन आणि संकलन व्यवस्थापक व्हिक्टोरिया आर्बर म्हणाल्या, ‘या जुन्या नमुन्याकडे नव्याने पाहून त्याला नवीन नाव मिळताना पाहणे खरोखरच खूप उत्सुकता वाढवणारे आहे.’ नोडोसॉरिड हे शरीरावर हाडांची कडक प्लेटस् (चिलखत) असलेले डायनासोर होते. हे ‘अँकिलोसॉरिड’ प्रजातीशी खूप साम्य दर्शवतात; मात्र अँकिलोसॉरिडप्रमाणे स्वसंरक्षणासाठी यांच्या शेपटीच्या टोकावर गदेसारखा जड भाग नसायचा. नोडोसॉरिडचे सांगाडे प्रामुख्याने उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये आढळले असून, आशियात ते फार कमी प्रमाणात सापडले आहेत.
जपानच्या ‘हॉक्काइडो’ या उत्तरेकडील मुख्य बेटावर १९९५ मध्ये हे अवशेष सापडले होते. संशोधकांच्या एका टीमने नुकताच या अवशेषांचा पुन्हा सखोल अभ्यास केला. सुमारे ९ कोटी ३० लाख ते १० कोटी वर्षे जुन्या असलेल्या या अवशेषांमध्ये कवटीचा मागील भाग, खालच्या जवड्याचा काही भाग, काही दात आणि हाडांच्या प्लेटस् चा समावेश आहे. वैज्ञानिक टीमने या अवशेषांचे ‘कॉम्प्युटेड टोमोग्राफी’ (CT) स्कॅन करून या नवीन प्रजातीचे रहस्य उघडकीस आणले आहे.