

वॉशिंग्टन : प्रशांत महासागराच्या अथांग तळाशी सापडलेल्या एका चमकदार, सोनेरी आणि गूढ वस्तूने गेली काही वर्षे वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकले होते. अखेर या ’गोल्डन ऑर्ब’चे रहस्य उलगडण्यात यश आले असून, हे एका विशिष्ट सागरी जीवाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
२०२३ मध्ये अलास्काजवळ समुद्रात मोहिमेवर असताना नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या (NOAA) ’सीस्केप अलास्का ५’ मोहिमेदरम्यान हा शोध लागला होता. समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ३.२ किलोमीटर (२ मैल) खाली एका खडकाला चिकटलेली ही मऊ आणि गुळगुळीत सोनेरी वस्तू पाहून सागरी जीवशास्त्रज्ञ थक्क झाले होते. ’ओशनोस एक्सप्लोरर’ या जहाजावरील रिमोटली ऑपरेटेड व्हेईकलच्या (ROV) साहाय्याने हा गोळा बाहेर काढण्यात आला होता, मात्र तरीही त्याचे स्वरूप स्पष्ट होत नव्हते.
सुरुवातीला ही वस्तू म्हणजे एखाद्या प्राण्याचे अंडे असावे किंवा एखादा स्पंज अथवा सूक्ष्मजीवांचा थर असावा, असे अनेक तर्क लावले जात होते. ‘प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, की नक्की ही वस्तू आहे तरी काय?‘ असे स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे प्राणीशास्त्रज्ञ ॲलन कॉलिन्स यांनी सांगितले. कॉलिन्स यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ताज्या विश्लेषणात या गूढ वस्तूची शरीररचना तपासण्यात आली. सुरुवातीला यात तोंड किंवा स्नायूंसारखे अवयव आढळले नाहीत, ज्यामुळे तो स्वतंत्र प्राणी नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, जेव्हा या वस्तूचा भाग सूक्ष्मदर्शकाखाली तपासला गेला, तेव्हा त्यात ’नेमॅटोसिस्ट’ म्हणजेच दंश करणाऱ्या पेशी आढळल्या.
या पेशी ’नायडेरिया’ या संघातील प्राण्यांचे वैशिष्ट्य आहेत, ज्यामध्ये जेलीफिश, सी ॲनिमोन आणि कोरल यांसारख्या ११,००० पेक्षा जास्त प्रजातींचा समावेश होतो. संशोधनानुसार, हा सोनेरी गोळा ’रेलिकॅन्थस डॅफनी’ (Relicanthus daphneae) नावाच्या एका रहस्यमय खोल सागरी जीवाने उत्सर्जित केलेला पदार्थ असल्याचे समोर आले आहे. हा जीव सी ॲनिमोनसारखा दिसतो, परंतु त्याच्या काही विशिष्ट गुणधर्मांमुळे तो वेगळा मानला जातो. हा शोध समुद्रगर्भातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.