

न्यूयॉर्क : निसर्ग नेहमीच आपल्या चमत्कारांनी मानवाला थक्क करत असतो. उत्तर अटलांटिक महासागरातील फॅरो आयलंडस् येथे असेच एक "Sørvágsvatn' (सोर्वाग्सवातं) नावाचे सरोवर आहे, जे दुरून पाहिल्यावर थेट समुद्राच्या वर तरंगत असल्याचा भास होतो. या सरोवराचा ‘ऑप्टिकल इल्युजन’ (दृष्टिभम) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.
हे सरोवर सुमारे 3.4 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे. हे सरोवर एका उंच कड्यावर वसलेले असून, समुद्राच्या पातळीपासून ते सुमारे 105 फूट (32 मीटर) उंचीवर आहे. कड्याचा उतार आतल्या बाजूला असल्याने, एका विशिष्ट कोनातून पाहिल्यास सरोवराची पातळी थेट कड्याच्या टोकापर्यंत असल्याचे वाटते. यामुळे सरोवर समुद्रावर तरंगत असल्याचा आभास निर्माण होतो. या सरोवराच्या नावावरून स्थानिक लोकांमध्ये आजही मतभेद आहेत : "Sørvágsvatn' (सोर्वाग्सवातं) : सरोवराच्या पश्चिमेला असलेल्या ‘सोर्वागूर’ गावातील लोक याला हे नाव देतात. त्यांच्या मते, हे गाव नवव्या शतकात वसलेले असून, सरोवराचा भाग त्यांच्याच क्षेत्रात येतो. Leitisvatn (लेतीस्वातं) : पूर्वेकडील ‘मिदवागूर’ आणि ‘सांदावागूर’ गावातील लोक याला हे नाव देतात. मिदवागूर हे गाव सरोवराच्या अधिक जवळ आहे. हा वाद टाळण्यासाठी स्थानिक लोक याला साध्या भाषेत केवळ ‘वातनिद’ (Vatnið) म्हणतात, ज्याचा अर्थ होतो ‘ते सरोवर’. सरोवराच्या एका टोकाला 100 फूट उंचीचा ‘बोसडालाफोसर’ (Bøsdalafossur) नावाचा भव्य धबधबा आहे. सरोवराचे जास्तीचे पाणी याच धबधब्याद्वारे थेट महासागरात कोसळते. सरोवराच्या सभोवताली असलेले उंच कडे या सरोवराला अधिक उंचीवर असल्याचा भास करून देतात.