Mystery of Floating Jumbo Planets | अंतराळात तरंगणार्‍या ‘जम्बो’ ग्रहांचे गूढ

Mystery of Floating Jumbo Planets |
Mystery of Floating Jumbo Planets | अंतराळात तरंगणार्‍या ‘जम्बो’ ग्रहांचे गूढ
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संस्था ‌‘नासा‌’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काही काळापूर्वी अंतराळात शोधलेले वादग्रस्त आणि रहस्यमयी ‌‘जम्बो‌’ ग्रह म्हणजे केवळ एक भास किंवा दृष्टीभ्रम नव्हता, तर ते खरोखरच अस्तित्वात असल्याचा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.

आकाशगंगेतील एका विशाल ताऱ्यांच्या निर्मिती केंद्रात गुरू ग्रहाच्या आकाराच्या, कोणत्याही ताऱ्याशी न जोडलेल्या मुक्त ग्रहांच्या दोन नव्या जोड्या शास्त्रज्ञांना सापडल्या आहेत. खगोलशास्त्रात अशा मुक्तपणे तरंगणाऱ्या ग्रहांच्या जोड्यांना ‌‘ज्युपिटर-मास बायनरी ऑब्जेक्टस्‌‍‌’ म्हणजेच संक्षिप्त रूपात ‌‘जम्बो‌’ म्हटले जाते. हे आकाराने आपल्या गुरू ग्रहापेक्षा साधारण ०.७ ते ३० पटीने मोठे असतात. २०२३ मध्ये जेम्स वेब टेलिस्कोपने ‌‘ओरियन नेब्युला‌’मध्ये अशा ४० जोड्या शोधल्या होत्या. कोणत्याही ताऱ्याभोवती न फिरता, केवळ स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाने एकमेकांभोवती फिरणाऱ्या या ग्रहाच्या शोधामुळे वैज्ञानिक जगतात मोठी खळबळ झाली होती. कारण, ग्रहांच्या निर्मितीच्या पारंपरिक सिद्धांतांना या शोधामुळे थेट आव्हान मिळाले होते.

२०२३ मधील या शोधामधून अनेक वाद निर्माण झाले होते. २०२४ मध्ये झालेल्या एका पुनर्परीक्षणानुसार काही शास्त्रज्ञांनी दावा केला होता की, जेम्स वेबने शोधलेले हे ग्रह नसून प्रत्यक्षात अतिशय दूर असलेले तारे आहेत, जे धुळीमुळे अंधुक दिसत आहेत आणि शास्त्रज्ञांना भास झाला आहे. परंतु, आता शास्त्रज्ञ कॅसेरेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दक्षिण आकाशातील ताऱ्यांच्या एका वेगळ्या समूहाचा, ज्याला ‌‘लोअर सेंटॉरस-क्रक्स‌’ (LCC) असोसिएशन म्हणतात, असा अभ्यास केला. हा समूह आपल्यापासून ३८५ प्रकाशवर्षे दूर आहे.

शास्त्रज्ञांनी ‌‘युरोपियन स्पेस एजन्सी‌’च्या गैया मोहिमेच्या डेटासह तब्बल ९,००० संशयित खगोलीय वस्तूंचा अभ्यास केला. गणिताच्या आधारे तपासणी केली असता, त्यांना या समूहामध्ये मुक्तपणे फिरणाऱ्या ग्रहांच्या आणखी दोन नव्या जोड्या सापडल्या. यातील पहिल्या जोडीला VVVX- FFP-001 आणि दुसऱ्या जोडीला VVVX- FFP-007 असे नाव देण्यात आले असून, त्यांचे वस्तुमान गुरू ग्रहापेक्षा अनुक्रमे १२ आणि ८ पट जास्त आहे. आकाशगंगेच्या एका पूर्णपणे वेगळ्या भागात या जोड्या सापडल्यामुळे हे सिद्ध होते की, ओरियन नेब्युलामध्ये दिसलेले ते ग्रह केवळ एक भास नव्हते. ‌‘जम्बो‌’ हा खरोखरच खगोलीय वस्तूंचा एक नवा प्रकार असू शकतो.

जीवसृष्टीची शक्यता?

शास्त्रज्ञ मिन्निटी यांच्या मते, अशा मुक्त ग्रहांच्या जोड्या जेव्हा एकमेकांभोवती अतिशय जवळून फिरतात, तेव्हा त्यांच्यातील गुरुत्वाकर्षणाच्या खेचाखेचीमुळे त्यांच्यात अंतर्गत उष्णता निर्माण होते. यामुळे एखादा तारा (सूर्य) नसला, तरीही त्यांच्यावर पाणी द्रव रूपात राहू शकते, जे भविष्यात जीवसृष्टीसाठी अनुकूल ठरू शकते. जरी या नव्या शोधामुळे ‌‘जम्बो‌’ ग्रहांच्या अस्तित्वाला मोठे पाठबळ मिळाले असले, तरी खगोल शास्त्रज्ञांच्या मते यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी जेम्स वेब टेलिस्कोपद्वारे अधिक सखोल निरीक्षणे नोंदवणे अजूनही आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news