400 Year Old Vampire Woman | ४०० वर्षांपूर्वीच्या ‘व्हॅम्पायर’ तरुणीचे रहस्य अखेर उलगडले

400 Year Old Vampire Woman |
400 Year Old Vampire Woman | ४०० वर्षांपूर्वीच्या ‘व्हॅम्पायर’ तरुणीचे रहस्य अखेर उलगडले
Published on
Updated on

वॉर्सो : पोलंडमधील पिएन गावाजवळ सापडलेल्या एका ४०० वर्षे जुन्या दफनभूमीने जागतिक स्तरावर संशोधकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका १७ ते १९ वर्षे वयाच्या तरुणीच्या सांगाड्याच्या गळ्यावर गंजलेला विळा आणि पायाच्या अंगठ्याला त्रिकोणी कुलूप लावलेले आढळले होते. मृत्यूनंतर ती पुन्हा जिवंत होऊन समाजात दहशत पसरवेल, या अंधश्रद्धेतून हे कृत्य करण्यात आले होते. ‘झोसिया’ असे नाव दिलेल्या या सांगाड्यावर नुकताच एक सखोल डीएनए आणि रासायनिक अभ्यास ‘जर्नल ऑफ आर्किओलॉजिकल सायन्स : रिपोर्ट्स’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

टोरोनमधील निकोलस कोपर्निकस विद्यापीठाचे प्राध्यापक दारियुझ पोलिंस्की यांच्या नेतृत्वाखाली २००५ पासून या भागात उत्खनन सुरू आहे. १७ व्या शतकातील या दफनभूमीत एकूण १०१ कबरी सापडल्या आहेत. संशोधकांच्या मते, मृत व्यक्ती परत येऊ नये म्हणून एकाच वेळी दोन कडक पद्धती (गळ्यावर विळा आणि पायाला कुलूप) वापरणे अत्यंत दुर्मीळ आहे. जर या मृतदेहाने उठण्याचा प्रयत्न केला असता, तर विळ्याच्या धारेने तिचे डोके धडावेगळे झाले असते. स्थानिक लोकांच्या मनात ही व्यक्ती ‘रेव्हनंट’ (मृत्यूनंतर परत येणारी दुष्ट शक्ती) बनून जिवंत माणसांना इजा पोहोचवेल, अशी तीव्र भीती होती, असे मत ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. जॉन ब्लेअर यांनी सांगितले.

या दफनभूमीत पालथे झोपवलेले लहान मूल, क्रुसावर चढवल्यासारख्या स्थितीत ठेवलेला सांगाडा, चावा घेता येऊ नये म्हणून कवटीभोवती दगड रचलेल्या कबरी अशा अनेक ‘विचित्र’ पद्धती आढळल्या आहेत. कॅथॉलिक चिन्हे (उदा. क्रॉस किंवा पदके) नसल्यामुळे ही प्रोटेस्टंट दफनभूमी असावी, असा अंदाज आहे.

डीएनए आणि समस्थानिक विश्लेषणावरून असे दिसून आले की, झोसिया स्थानिक परिसरात मोठी झाली होती. तिचे मातृवंशीय डीएनए स्कॅन्डिनेव्हियन वंशाशी जोडलेले असू शकते. तिच्या कवटीजवळ सापडलेल्या रेशमी टोपीच्या अवशेषांमध्ये शुद्ध सोने आणि चांदीचे धागे विणलेले आढळले. याच काळातील पोलंडचे राजे तिसरे सिगिस्मंड वासा यांच्या शाही कपड्यांतही इतके शुद्ध सोन्याचे धागे नव्हते. तिच्या तोंडात तांबे आणि सोन्याचे मिश्रण असलेली वस्तू ठेवली गेली होती, जी दुष्ट शक्तींना रोखण्यासाठी असावी.

१७ व्या शतकात मध्य युरोपमध्ये दुष्काळ, साथीचे रोग किंवा अनपेक्षित आपत्ती आल्यास त्याला अशा ‘विचित्र’ व्यक्तींचे अलौकिक कृत्य मानले जाई. झोसियाच्या छातीच्या हाडावर गाठ असावी, त्यामुळे तिच्या शरीराचा आकार काहीसा बदलला होता. समाजाच्या अंधश्रद्धेने आणि भीतीने या श्रीमंत तरुणीला मृत्यूनंतरही ‘व्हॅम्पायर’ ठरवून कायमचे बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news