

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या पटलावर जवळपास एक ट्रिलियन सूक्ष्म जीवांच्या प्रजाती अस्तित्वात असून, त्यातील बहुतांशी जीवाणू आहेत. आतापर्यंत संशोधक असे जिवाणू केव्हा व कसे विकसित झाले, हे शोधू शकले नव्हते. याचे कारण म्हणजे, अशा जीवाणूत ना हाडाचा अंश असतो, ना त्याच्यात भूशास्त्रीय रेकॉर्डमध्ये त्यांच्या खुणा स्पष्ट आढळून येतात. आता मात्र या परिस्थितीत बदल झाला असून, मशिन लर्निंगच्या माध्यमातून जीवाणूच्या विकासाची कालखंड शोधून काढण्यात संशोधकांना यश आले आहे. यातील काही जीवाणूंनी ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता 900 कोटी वर्षांपूर्वीच विकसित केली होती, असे आढळून आले. आश्चर्य म्हणजे इतक्या प्राचीन काळात पृथ्वीतळावर ऑक्सिजनदेखील दुर्मीळच होते.
संशोधकांनी एक एआय मॉडेल आता तयार केले असून, त्याच्या जिनोमच्या माध्यमातून जीवाणूच्या पूर्वजात ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता कशी होती, याचा शोध घेणे शक्य होणार आहे. हे तंत्र इतके बिनचूक विकसित झाले की, यामुळे जीवाश्माप्रमाणेच जीवाणूला डेटिंग पॉईंटप्रमाणे वापरून त्याचा कालखंड स्पष्ट होऊ शकला आहे.
2.4 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीच्या वायूमंडळात अचानक ऑक्सिजनचा लोट आला, त्यावेळी त्याला ग्रेट ऑक्सिडेशन इव्हेंट असे म्हटले जात होते. या बदलाचे कारण सायनोबॅक्टेरिया होते, ज्यांनी सूर्य प्रकाशापासून ऊर्जा घेत ऑक्सिजन उत्सर्जन सुरू केले होते. त्यावेळी बहुतांशी जिवाणूंसाठी ऑक्सिजन विषासमान होते. त्यामुळे बहुतांशी जिवाणू नष्ट झाले. मात्र, सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित नव्या रिसर्चमधील निष्कर्षानुसार, काही जीवाणू त्यापूर्वीच ऑक्सिजनसह तग धरून राहण्यात यशस्वी झाले होते, असे आढळून आले आहे.