500-Year-Old Ice Mummies | ५०० वर्षांपूर्वीच्या ‘आईस ममीज’चे उलगडले गूढ

500-Year-Old Ice Mummies |
500-Year-Old Ice Mummies | ५०० वर्षांपूर्वीच्या ‘आईस ममीज’चे उलगडले गूढ
Published on: 
Updated on: 

मिसिसिपी : दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगांतील २० हजार फूटांहून अधिक उंचीवरील शिखरांवर सुमारे ५०० वर्षांपूर्वी इयंका साम्राज्यात दिल्या गेलेल्या बालकांच्या नरबळींचे (कॅपाकोचा प्रथा) थरारक वास्तव आता आधुनिक विज्ञानाच्या मदतीने समोर येत आहे. १९९० च्या दशकात पेरू, चिली आणि अर्जेंटिना येथील बर्फाळ शिखरांवर सापडलेल्या लहान मुलांच्या अतिशय सुस्थितीतील मृतदेहांवर (‘आईस ममीज’) २०२६ मध्ये झालेल्या नवीन वैद्यकीय आणि रासायनिक संशोधनातून या मुलांचा प्रवास, त्यांना दिलेली गुंगीची औषधे आणि त्यांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचे गूढ उकलले आहे.

१५ व्या आणि १६ व्या शतकात इयंका साम्राज्यात देवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि साम्राज्याचा विस्तार दृढ करण्यासाठी लहान मुले व तरुणींचा बळी दिला जात असे. याला ‘कॅपाकोचा’ असे म्हटले जाई. या मुलांना साम्राज्याची राजधानी कुझको येथे आणून धार्मिक विधी केले जात आणि त्यानंतर हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास करून त्यांना अँडीजच्या उंच शिखरांवर नेले जाई. एल प्लोमो शिखरावर सापडलेल्या ८-९ वर्षांच्या मुलाने मृत्यूपूर्वी तब्बल नऊ महिने २,६०० किलोमीटरचा पायी प्रवास केल्याचे त्याच्या केसांतील समस्थानिक तपासणीतून स्पष्ट झाले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ डॅगमारा सोचा यांच्या नेतृत्वाखाली आठ बालकांच्या ममींचे केस आणि नखांचे रासायनिक विश्लेषण करण्यात आले. बळी देण्यापूर्वी कित्येक महिने आधीपासून या मुलांना कोकाची पाने (ज्यामध्ये नैसर्गिक कोकेन असते) आणि मक्यापासून बनवलेली 'चिचा' दारू दिली जात होती. प्रसिद्ध 'जुआनिता' या १४ वर्षांच्या मुलीच्या ममीमध्ये 'हार्माइन' हे नैराश्य कमी करणारे आणि भ्रम निर्माण करणारे रसायनही आढळले आहे.

आतापर्यंत असे मानले जात होते की, या मुलांना बर्फात सोडून गोठवून मारले गेले किंवा त्यांचा गळा आवळला गेला. मात्र, व्हेरोनिका सिल्वा-पिंटो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सीटी स्कॅन तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाचा मृत्यू थंडीने झाला नसून, इयंका सैनिकांच्या ताऱ्याच्या आकाराच्या गदेने डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या करण्यात आली होती. प्रहार होण्यापूर्वी त्याला शेवटचे धार्मिक भोजन दिले गेले होते. जगातील सर्वात उंच पुरातत्व स्थळ असलेल्या लुल्लाइलाको शिखरावरील मुलांना मात्र गुंगीच्या अवस्थेतच अतिथंडीत सोडून दिल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.