

कोपेनहेगन : डेन्मार्कच्या किनारपट्टीवर 2,400 वर्षांपूर्वी बुडलेल्या समुद्री लुटारूंच्या एका नौकेने संशोधकांना नवीन दिशा दिली आहे. या नौकेवर सापडलेला एक हाताचा ठसा आणि काही रासायनिक पुरावे यांच्या आधारे हे लुटारू नेमके कुठून आले होते, याचा शोध आता शास्त्रज्ञ लावत आहेत.
‘जॉर्टस्प्रिंग’ नावाने ओळखली जाणारी ही नौका स्कॅन्डिनेव्हियातील लाकडी फळ्यांपासून बनवलेली सर्वात जुनी नौका आहे. सध्या ही नौका डेन्मार्कच्या नॅशनल म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. मात्र, ही नौका नक्की कोणाची होती आणि कुठून आली होती, हे कोडे अनेक दशकांपासून कायम होते.
लुंड युनिव्हर्सिटीतील पुरातत्त्वशास्त्रज्ञ मायकेल फॉव्हेल यांच्या मते: साधारण 2,400 वर्षांपूर्वी, सुमारे 80 समुद्री लुटारूंच्या एका ताफ्याने (ज्यामध्ये ही आणि इतर तीन नौका होत्या) डेन्मार्कजवळील ‘अल्स’ बेटावर हल्ला केला होता. विजयाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी, अल्स बेटावरील रहिवाशांनी लुटारूंची ही नौका, त्यांची शस्त्रे आणि ढालींसह एका दलदलीत अर्पण म्हणून बुडवून टाकली. चौथ्या शतकात ही नौका पाण्यात बुडाल्याने आणि तिथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने ती शतकानुशतके सुरक्षित राहिली. 1880 च्या सुमारास या नौकेचा शोध लागला आणि 1920 मध्ये ती दलदलीतून बाहेर काढण्यात आली.
फॉव्हेल म्हणतात की, ‘त्याकाळी ही नौका कुठून आली हे शोधण्यासाठी आमच्याकडे आधुनिक वैज्ञानिक पद्धती नव्हत्या.’ अलीकडेच संशोधकांनी या नौकेचा पुन्हा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. नौकेचे जतन करण्यासाठी त्यावर रसायने वापरण्यात आली होती, त्यामुळे संशोधकांनी जुन्या कागदपत्रांचा आणि अर्काइव्हचा आधार घेऊन नौकेचे असे भाग शोधले ज्यांना अद्याप कोणीही स्पर्श केला नव्हता. या नौकेवर सापडलेला हाताचा ठसा आणि रासायनिक खुणांमुळे हे लुटारू नेमके कोणत्या प्रदेशातील होते, याचा नकाशा तयार करणे आता शक्य होणार आहे. यामुळे उत्तर युरोपातील प्राचीन समुद्री युद्धांचा इतिहास समजून घेण्यास मोठी मदत होईल.