Secret Of The Old 'Red Lines' | ब्रिटिश बेटांवरील सर्वात प्राचीन मानवनिर्मित कलाकृतीचा शोध

१७,००० वर्षे जुन्या ‘रेड लाईन्स’चे रहस्य उलगडले
Secret Of The Old 'Red Lines' |
Secret Of The Old 'Red Lines' | ब्रिटिश बेटांवरील सर्वात प्राचीन मानवनिर्मित कलाकृतीचा शोध
Published on
Updated on

लंडन : गेल्या शंभर वर्षांपासून ज्या लाल रेषांना निसर्गाचा चमत्कार म्हणून तज्ज्ञांनी नाकारले होते, त्या प्रत्यक्षात मानवनिर्मित ऐतिहासिक कलाकृती असल्याचे आता सिद्ध झाले आहे. वेल्समधील एका गुहेत सापडलेल्या समांतर लाल रेषा या पुराश्मयुगीन कलेचा एक दुर्मीळ नमुना आहेत, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. सुमारे १७,००० वर्षे जुन्या असलेल्या या रेषा ब्रिटिश बेटांवरील पाषाण कलेचे सर्वात जुने उदाहरण ठरल्या आहेत.

नैऋत्य वेल्समधील ‘गोवर’ द्वीपकल्पातील चुनखडीच्या कड्यांमध्ये ‘बेकन होल’ नावाची एक गुहा आहे. इ.स. १९१२ मध्ये भूवैज्ञानिक आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या एका पथकाला या गुहेच्या आत ११ आडव्या रेषांचे एक पॅनल आढळले होते. या शोधाने त्यावेळी अटलांटिकच्या दोन्ही बाजूंच्या (युरोप आणि अमेरिका) वैज्ञानिक जगतात मोठी खळबळ उडवून दिली होती. कारण, ब्रिटनमध्ये सापडलेली ही पहिलीच उत्तर-पुराश्मयुगीन (Upper Paleolithic - ५०,००० ते १२,००० वर्षांपूर्वीची) पाषाण कला असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला होता. मात्र, १९२८ पर्यंत अनेक संशयवाद्यांनी यावर आक्षेप घेतला.

या रेषा मानवनिर्मित नसून केवळ एक नैसर्गिक चमत्कार आहेत, असा दावा त्यांनी केला. इ.स. २०२२ मध्ये संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने या पॅनलचा पुन्हा शोध घेतला. त्यांनी या रेषांवर असलेल्या रंगाच्या घटकांचे वैज्ञानिक विश्लेषण केले आणि त्या कोणत्या काळातील असाव्यात याचा अंदाज लावला. ‘क्वार्टर्नरी’ या नियतकालिकात २६ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी या पॅनलवर साचलेल्या कॅल्साईटच्या थराची ‘युरेनियम-थोरियम डेटिंग’ पद्धतीद्वारे तपासणी केली. यातून असे दिसून आले की, या आडव्या रेषा किमान १८,३०० ते १५,७०० वर्षांपूर्वी तयार केल्या गेल्या होत्या. भूगर्भातील पाण्यामुळे कॅल्साईटमधील युरेनियम वाहून जाऊ शकते, ज्यामुळे या पद्धतीत कलाकृतीचे वय आहे त्यापेक्षा जास्त दिसण्याचा धोका असतो. परंतु, शास्त्रज्ञांनी इतर पुराव्यांचा आधार घेत या वयाचा अचूक अंदाज लावला आहे.

संशोधनात या रेषांबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी समोर आल्या आहेत. या रेषांना लाल रंग ‘हेमटाईट’ (Hematite - लोह ऑक्साईड) मुळे मिळाला आहे. हा घटक गुहेच्या इतर भागांतील खडकांमधून नैसर्गिकरीत्या पाझरतो. या सर्व रेषा एकमेकांपासून अगदी सारख्या (समांतर) अंतरावर आहेत. यावरून त्या कोणत्याही नैसर्गिक प्रक्रियेतून तयार न होता, मानवाने अतिशय विचारपूर्वक आणि रचनेनुसार बनवल्याचे स्पष्ट होते. गुहेत इतर ठिकाणीही बोटांचे ठसे आणि हेमटाईट रंगाचे उडालेले तुषार आढळले आहेत, जे मानवी हस्तक्षेपाची साक्ष देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news