golden rod mystery : पद्मनाभस्वामी मंदिरातील सोन्याच्या रॉडचा रहस्यमय शोध

mystery-golden-rod-padmanabhaswamy-temple-discovery
पद्मनाभस्वामी मंदिरातील सोन्याच्या रॉडचा रहस्यमय शोधPudhari File Photo
Published on
Updated on

तिरुवनंतपुरम : केरळमधील ऐतिहासिक श्री पद्मनाभस्वामी मंदिरात एक अजब आणि रहस्यमय घटना समोर आली आहे. मंदिरातून गायब झालेला सोन्याचा एक रॉड काही दिवसांनी मंदिराच्या परिसरातच वाळूत गाडलेल्या अवस्थेत आढळून आला, ज्यामुळे सर्वत्र आश्चर्य आणि चर्चा सुरू झाली आहे. भक्तांनी याला चमत्कार मानत, भगवान विष्णूंनी आपली मौल्यवान वस्तू स्वतः परत आणल्याचा दावा केला आहे.

ही घटना 27 एप्रिलपासून सुरू झाली. मंदिराच्या गर्भगृहातील दरवाज्यांची दुरुस्ती सुरू होती. त्यासाठी वापरण्यात येणार्‍या सोन्याच्या प्लेटस् वेल्ड करण्यासाठी 12 सेंटिमीटर लांबीचा सोन्याचा वेल्डिंग रॉड तयार करण्यात आला होता. हे काम बुधवारी पूर्ण झाले आणि सर्व सोन्याचे साहित्य कपड्याच्या पिशवीत ठेवून स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. परंतु, शनिवार सकाळी पिशवी उघडल्यावर रॉड गायब असल्याचे आढळले. तत्काळ खळबळ उडाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये बुधवारी रॉड सुरक्षित ठेवलेले दिसत होते.

गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी कोणतेही काम झाले नव्हते आणि स्ट्राँग रूमही उघडण्यात आले नव्हते. तरीसुद्धा रॉड गायब झाले होते. त्यामुळे तपास यंत्रणांनी मंदिराच्या आतील कोणावर तरी संशय व्यक्त केला. या तपासात स्निफर डॉग्स च्या मदतीने शोध घेतला गेला आणि रविवारी रॉड मंदिराच्या परिसरातील वाळूत गाडलेले आढळले. विशेष म्हणजे, सीसीटीव्हीमध्ये कोणतीही संशयास्पद व्यक्ती दिसून आला नाही आणि स्ट्राँग रूमचे कुलूपही अखंड होते.

या घटनेमुळे भक्तांनी याला भगवंताची लीला मानली असून, अनेकांनी म्हटले की, ‘भगवंतानेच आपली अमानत परत आणली आहे.’ दरम्यान, पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. ज्या अधिकार्‍यांकडे सोन्याची जबाबदारी होती, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. एक शक्यता अशी मांडली जात आहे की, चोरी करणार्‍याने भीतीपोटी रॉड परत ठेवले असावे. पण, भक्तांसाठी हे अद्यापही एक गूढ आणि चमत्कारिक घटना आहे...दरवाजा न उघडता, कोणताही संशयित न दिसता, सोन्याचे रॉड वाळूत कसे पोहोचले?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news