Neanderthal extinction | निएंडरथल मानवाच्या विनाशाचे रहस्य उलगडले

आधुनिक मानवाचाही होता मोठा हातभार
Neanderthal extinction
Neanderthal extinction | निएंडरथल मानवाच्या विनाशाचे रहस्य उलगडले
Published on
Updated on

लंडन : सुमारे 37,000 वर्षांपूर्वी, आजच्या दक्षिण स्पेनच्या भागात निएंडरथल मानवांचे छोटे छोटे गट वास्तव्यास होते. एकेकाळी अर्धा दशलक्ष वर्षे पृथ्वीवर अधिराज्य गाजवणार्‍या या प्रजातीला आपण आपल्या वंशाचे शेवटचे प्रतिनिधी आहोत, याची पुसटशी कल्पनाही नसावी. शास्त्रज्ञांनी आता निएंडरथल मानवांच्या विनाशाची नेमकी कारणे शोधून काढली असून, त्यात आधुनिक मानवाचा (होमो सेपियन्स प्रजाती) सहभाग असल्याचे समोर आले आहे.

पूर्वी निएंडरथल मानवांना रानटी किंवा बुद्धिहीन समजले जात असे. मात्र, गेल्या 150 वर्षांतील संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, ते अत्यंत प्रगत होते. ते दगडाची आधुनिक हत्यारे बनवत, पक्षी आणि आळंबी खात, खडकांवर चिन्हे कोरत आणि पिसे व शंखांपासून दागिने तयार करत. इतकेच नाही तर ते मृतांचे दफन करत. त्यांच्याकडे संवादाची प्रगत कौशल्येही होती. न्यूयॉर्क विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ शारा बेली यांच्या मते, निएंडरथल संपण्यामागे एकच कारण नसून अनेक गुंतागुंतीच्या घटकांचा ‘परफेक्ट स्टॉर्म’ कारणीभूत होता.

नैसर्गिक आपत्ती : इटलीतील ‘फ्लेग्रियन फील्डस्’मधील ज्वालामुखीच्या भीषण उद्रेकाने भूमध्य क्षेत्रातील अन्नसाखळी विस्कळीत केली होती.

अनुवांशिक समस्या : निएंडरथल गट एकमेकांपासून विलग झाल्यामुळे त्यांच्यात ‘इनब्रीडिंग’ (एकाच कुटुंबात प्रजनन) वाढले, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली.

आधुनिक मानवाशी स्पर्धा : सुमारे 55,000 ते 45,000 वर्षांपूर्वी जेव्हा आधुनिक मानव म्हणजेच ‘होमो सेपियन्स’ ही मानवाची बुद्धिमान प्रजाती युरोपात पोहोचली, तेव्हा या दोन्ही प्रजातींनी किमान 2,600 ते 7,000 वर्षे एकत्र काळ घालवला.

संशोधकांच्या मते, आधुनिक मानवाने निएंडरथलचा नायनाट थेट हिंसाचारातून किंवा युद्धातून केला असावा किंवा अन्नासारख्या संसाधनांच्या स्पर्धेतून आणि आपल्यासोबत आणलेल्या नवीन आजारांमुळे निएंडरथल मानवांची संख्या घटली असावी. सुमारे 34,000 वर्षांपूर्वी ही प्रजाती पूर्णपणे नामशेष झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news