

वॉशिंग्टन : वर्षानुवर्षे खगोलशास्त्रज्ञांना कोड्यात टाकणाऱ्या एका ‘अशक्य’ मानल्या गेलेल्या कृष्णविवरांच्या विलीनीकरणाचे स्पष्टीकरण अवकाशातील एका दुर्मीळ घटनेद्वारे दिले जाऊ शकते, असा संशय संशोधकांनी व्यक्त केला आहे. आईन्स्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताशी संबंधित असलेल्या या घटनेमुळे हे गूढ उकलण्यास मदत होत असली, तरी या सिद्धांताने विज्ञानासमोर एक नवीन आणि मोठा प्रश्न उभा केला आहे.
२३ नोव्हेंबर २०२३ रोजी, अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि लुईझियाना येथे असलेल्या ‘लिगो’ (LIGO - Laser Interferometer Gravitational-Wave Observatory) या प्रयोगशाळेतील दोन्ही डिटेक्टर्सनी अत्यंत असामान्य गुरुत्वाकर्षण लहरी नोंदवल्या. अवकाशाच्या ताण्याबाण्यातील या लहरी महाकाय ताऱ्यांचे स्फोट किंवा वेगाने फिरणारे न्यूट्रॉन तारे यांसारख्या विश्वातील अत्यंत शक्तिशाली घटनांमुळे निर्माण होतात. परंतु, ‘GW231123’ नाव देण्यात आलेला हा सिग्नल पृथ्वीपासून सुमारे २ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दोन कृष्णविवरांच्या भीषण टक्करीमुळे निर्माण झाला होता. हे विलीनीकरण माध्यमांमध्येही प्रचंड चर्चेचा विषय ठरले. कारण, ही आजवर नोंदवली गेलेली सर्वात महाकाय कृष्णविवरांची टक्कर होती.
या दोन मूळ कृष्णविवरांच्या एकत्र येण्याने सूर्यापेक्षा सुमारे २३० पट अधिक वस्तुमान असलेल्या एका नवीन महाकाय कृष्णविवराचा जन्म झाला; पण अडचण अशी आहे की, या टक्करीत सामील असलेली दोन्ही कृष्णविवरे (ज्यांचे वजन अनुक्रमे १०० आणि १३० सूर्य वस्तुमानाइतके होते) आपल्या विश्वाच्या सध्याच्या वैज्ञानिक आकलनानुसार अत्यंत मोठी आणि अशक्यप्राय आहेत. खगोलशास्त्रज्ञांच्या मते ही कृष्णविवरे एका ‘मास गॅप’मध्ये येतात. याचा अर्थ, ताऱ्यांचा अंत झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या ‘स्टेलर-मास’ कृष्णविवरांपेक्षा ही आकाराने खूप मोठी आहेत. परंतु, ‘मध्यम-वस्तुमान’ कृष्णविवरांपेक्षा लहान आहेत; ज्यांच्याबद्दल आपल्याला अजूनही पूर्ण माहिती नाही.
या विचित्रतेत भर म्हणजे, एकमेकांवर आदळताना ही कृष्णविवरे अपेक्षेपेक्षा खूप जास्त वेगाने स्वतःभोवती फिरत होती. या कृष्णविवरांच्या ‘निषिद्ध’ किंवा नियमबाह्य आकाराचे स्पष्टीकरण देण्यासाठी संशोधकांनी काही संभाव्य सिद्धांत मांडले आहेत. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात या आकाराची कृष्णविवरे कशी तयार होऊ शकतात, याचा एक नवीन मार्ग सुचवला गेला होता : मोठ्या ताऱ्यांचा सुपरनोव्हा स्फोट न होता, ते थेट कोसळून अशी कृष्णविवरे बनू शकतात. मात्र, हा विचार यापूर्वी उपलब्ध असलेल्या अनेक निरीक्षणात्मक पुराव्यांच्या विरोधात जातो.