

तेहरान : इराणची राजधानी तेहरानच्या आकाशात रात्रीच्या अंधारात एक अत्यंत चमकदार आणि रहस्यमय वस्तू दिसल्याने अर्ध्या शतकापूर्वीच्या एका सर्वात मोठ्या आणि अद्याप न उलगडलेल्या रहस्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वस्तू आकाशात घिरट्या घालत असताना स्पष्टपणे दिसत आहे. ही वस्तू एखादा प्रगत ड्रोन आहे, गुप्त लष्करी विमान आहे की, खरोखरच दुसऱ्या दुनियेतील एलियन स्पेसशिप (उडती तबकडी), यावर आता चर्चा रंगली आहे.
याआधी ठीक ५० वर्षांपूर्वी देखील तेहरानचे आकाश अशाच एका भीतीदायक आणि थक्क करणाऱ्या घटनेचे साक्षीदार बनले होते, जेव्हा तिथल्या हवाई दलाच्या विमानांचे रडार आणि शस्त्रे अचानक ठप्प झाली होती. इराणी अधिकाऱ्यांकडून या नवीन व्हिडीओबाबत किंवा रहस्यमय वस्तूबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. मात्र, या घटनेमुळे लोकांना १९ सप्टेंबर १९७६ रोजी तेहरानच्या आकाशात घडलेल्या ५० वर्षे जुन्या घटनेची आठवण झाली आहे. तेव्हा शिमिरान परिसरातील लोकांनी आकाशात एक अत्यंत चमकदार आणि विचित्र वस्तू पाहिल्याचा दावा केला होता.
अमेरिकन सरकारच्या एका डीक्लासिफाईड (सार्वजनिक केलेल्या) अहवालानुसार, त्या वेळी इराणी हवाई दलाच्या दोन F-4 फँटम फायटर जेटस्ना तपासासाठी पाठवण्यात आले होते. पहिल्या विमानाचा अनुभव : पहिल्या विमानातील पायलटच्या दाव्यानुसार, तो जसा त्या वस्तूजवळ पोहोचला, तसे त्याच्या विमानाची सर्व यंत्रणा आणि दळणवळण (कम्युनिकेशन) बंद पडले. विमान दूर गेल्यावर यंत्रणा पूर्ववत झाली.
दुसऱ्या विमानाचा अनुभव : यानंतर पाठवलेल्या दुसऱ्या जेटने रडारवर त्या वस्तूचा पाठलाग केला. त्या मुख्य वस्तूपासून एक लहान वस्तू वेगळी झाल्याचे दिसून आले. पायलटने जेव्हा त्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या विमानाची शस्त्रे आणि दळणवळण यंत्रणा पुन्हा ठप्प झाली. सैन्य विमानांशी संबंधित प्रसिद्ध यूएफओ प्रकरणांमध्ये या घटनेची गणना आजतागायत केली जाते. सध्याच्या व्हिडीओबाबत सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये दोन गट पडले आहेत. काहींच्या मते हा लष्करी ड्रोन किंवा ड्रोनचा समूह असू शकतो, तर काहीजण याला UFO (Unidentified Aerial Phenomena) मानत आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही दाव्यात अधिकृत सत्यता आढळलेली नाही.