Mysterious Substance | टायटन आणि प्लूटोवर आढळला एक गूढ पदार्थ

शास्त्रज्ञही चक्रावले!
Mysterious Substance |
Mysterious Substance | टायटन आणि प्लूटोवर आढळला एक गूढ पदार्थ
Published on
Updated on

न्‍यूयॉर्क : शनीचा सर्वात मोठा चंद्र ‘टायटन’ आणि सूर्यमालेच्या टोकावर असलेला बटुग्रह ‘प्लूटो’ यांच्या पृष्ठभागावर एका अत्यंत गूढ आणि अनाकलनीय पदार्थाचा शोध लागला आहे. हा पदार्थ नेमका काय आहे, याबाबत शास्त्रज्ञ अजूनही अनभिज्ञ आहेत. पॅरिस ऑब्झर्व्हेटरीचे बर्नार्ड बेझार्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप'च्या (जेडब्‍ल्‍यूएसटी) डेटाचा अभ्यास करून हा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे.

शोध कसा लागला?

खगोलशास्त्रज्ञ सहसा दूरवरच्या जगाचा अभ्यास करण्यासाठी ‘स्पेक्ट्रोस्कोपी' या तंत्रज्ञानाचा वापर करतात. यामध्ये रसायनांद्वारे शोषून घेतलेल्या, परावर्तित झालेल्या किंवा उत्सर्जित झालेल्या प्रकाशाच्या तरंगलांबीचे विश्लेषण केले जाते. जेम्स वेब टेलिस्कोपच्या साहाय्याने शास्त्रज्ञांना असे दिसून आले की, टायटनच्या पृष्ठभागावर एका विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश एका अज्ञात घटकाद्वारे शोषला जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अगदी तशीच तरंगलांबी प्लूटोच्या पृष्ठभागावरही शोषली जात असल्याचे आढळले.

दोन वेगवेगळ्या जगांमधील समान धागा

वरवर पाहता टायटन आणि प्लूटो हे एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. प्लूटो हा टायटनपेक्षा खूप जास्त थंड आहे. प्लूटोच्या पृष्ठभागावर द्रव पाण्याचे महासागर नाहीत आणि त्याचे वातावरण टायटनच्या तुलनेत १५,००० पटीने कमी दाट आहे. मात्र, असे असूनही या दोन्ही खगोलीय वस्तूंच्या वातावरणातील ‘रसायनशास्त्र' बरेचसे मिळतेजुळते आहे.

उत्सुकता आणि पुढील संशोधन

शास्त्रज्ञांनी या गूढ लहरींची तुलना प्रयोगशाळेतील ज्ञात रसायने आणि बर्फाच्या विविध प्रकारांशी करून पाहिली; परंतु एकाचाही ताळमेळ लागला नाही. संशोधक बर्नार्ड बेझार्ड यांच्या मते, ‘‘हा कोणताही साधा किंवा एकटा घटक नसून, काही रेणूंचे जटिल मिश्रण असण्याची शक्यता आहे. आमच्याकडे काही पर्याय आहेत; पण हा घटक जो काही असेल, तो सर्वांना आश्चर्यचकित करणारा असेल.’’ टायटनवर परग्रहवासीयांचे जीवन असण्याची शक्यता नेहमीच वर्तवली जाते, त्यामुळे तिथले रसायनशास्त्र समजून घेण्यासाठी हा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news