

सान होजे : मध्य अमेरिकेतील सुंदर देश असलेल्या कोस्टारिकाच्या दक्षिणेकडील डिक्विस डेल्टा क्षेत्रात, जवळपास १०० वर्षांपूर्वी केळीच्या बगिचांसाठी घनदाट वर्षावने साफ केली जात असताना मजुरांना एका अशा विचित्र गोष्टीचा सामना करावा लागला, जिने संपूर्ण जगातील पुरातत्त्व तज्ज्ञांना थक्क केले. घनदाट जंगलांच्या दरम्यान जमिनीत गाडलेले शेकडो विशाल आणि पूर्णपणे गोल आकाराचे दगड सापडले. स्थानिक भाषेत त्यांना ‘लास बोलास डी पिएड्रा’ म्हणजेच ‘दगडाचे गोल’ म्हटले जाते. हे रहस्यमय दगड आजही वैज्ञानिकांसाठी एक सुटलेले नसलेले कोडे बनलेले आहेत.
हे शेकडो दगड अत्यंत काळजीपूर्वक तयार केले गेले असावेत, असे वाटते. इतक्या अचूक आणि सफाईदार पद्धतीने हे गोळे कोणी बनवले असतील, याबद्दल वैज्ञानिक थक्क झाले आहेत. या भागातील लोकांचा असा समज आहे की, हे दगड एलियंसने (परग्रहवासीयांनी) पृथ्वीवर आणले असावेत आणि यांच्यामध्ये संपत्ती भरलेली असेल. याच समजुतीपोटी काही दगड फोडूनही पाहण्यात आले, मात्र त्यातून काहीही निघाले नाही. उत्खननात सापडलेले हे दगड एखाद्या मशिनसारखे अगदी गोल आणि स्पर्शाला अत्यंत गुळगुळीत होते. काही दगड केवळ काही इंचांचे होते, तर काहींचा व्यास अनेक फूट होता आणि त्यांचे वजन अनेक टन नोंदवले गेले. आतापर्यंतच्या तपासणीतून असे समोर आले आहे की, हे कोणतेही साधारण दगड नसून ‘गैब्रो’ नावाच्या अत्यंत कठीण ज्वालामुखीय खडकातून कोरून तयार केले आहेत.
पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मते, हे रहस्यमय दगड ‘डिक्विस संस्कृती’च्या लोकांनी साधारणपणे इसवी सन ७०० ते १५३५ च्या दरम्यान तयार केले होते. जेव्हा या प्राचीन सभ्यतेचा अंत झाला आणि लोक ही जागा सोडून निघून गेले, तेव्हा काळाच्या ओघात हा परिसर घनदाट जंगलात बदलला आणि हे दगड शतकानुशतके जगाच्या नजरेपासून लपलेले राहिले. जंगलांमधून हे अनोखे गोल दगड बाहेर येताच, त्यांच्या निर्मितीच्या कारणाबाबत निरनिराळ्या कथा आणि मिथके समोर येऊ लागली. काही लोकांचा असा दावा होता की, कोणतीही आधुनिक मशिनरी नसताना माणसे इतके अचूक आणि गोल दगड बनवू शकत नाहीत,
त्यामुळे यांची निर्मिती परग्रहवासीयांनी केली आहे. हे दगड जलमय झालेल्या पौराणिक ‘अटलांटिस’ शहराचे संकेत आहेत, असा एक सिद्धांतही मांडला गेला. यादरम्यान एक मोठा अंधविश्वास पसरला की, या दगडांच्या आत सोने भरले आहे. सोन्याच्या लोभापायी अनेक मजुरांनी डायनामाईट लावून डझनभर प्राचीन दगड उडवून दिले. या सततच्या नुकसानीनंतर आणि चोरीच्या घटनांमुळे १९८० च्या दशकात कोस्टारिका सरकारने त्यांना राष्ट्रीय ठेवान घोषित केले. त्यानंतर २०१४ मध्ये युनेस्कोने डिक्विसच्या या रहस्यमय दगडांना ‘जागतिक वारसा स्थळ’चा दर्जा दिला.