

पर्थ : शास्त्रज्ञांनी अंतराळातून गूढ सिग्नल्स पाठवणार्या एका रहस्यमय वस्तूचा छडा लावला आहे; मात्र या खगोलीय वस्तुचे स्वरूप काय आहे, हे त्यांना अजूनही स्पष्ट झालेले नाही. या वस्तूचे नाव आहे ASKAP J-0911 आणि ती दर 44 मिनिटांनी सलग 2 मिनिटे रेडिओ तरंगलहरी आणि क्ष-किरणांचे स्पंदन पाठवते. हे अत्यंत अनोखे आणि नियमित सिग्नल्स ऑस्ट्रेलियन स्क्वेअर किलोमीटर अॅरे पाथफाइंडर (ASKAP) आणि नासा चंद्रा एक्स-रे वेधशाळा यांच्या साहाय्याने शोधण्यात आले.
28 मे रोजी ‘नेचर’ या प्रतिष्ठित विज्ञान जर्नलमध्ये या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित झाले. ‘ही वस्तू कोणत्याही पूर्वी पाहिलेल्या खगोलीय वस्तूपेक्षा वेगळी आहे,’ असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि पर्थच्या कर्टिन विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ अँडी वँग यांनी सांगितले. वँग यांच्या म्हणण्यानुसार, ‘ASKAP J1832-0911’ हे एखादे मॅग्नेटार असू शकते, मृत तार्याच्या केंद्रस्थानी असलेली तीव्र चुंबकीय क्षेत्र असलेली वस्तू किंवा एखाद्या जुळ्या तार्यांच्या युग्मात असलेला अत्यंत चुंबकीय ‘व्हाईट ड्वार्फ’ (विकसित अवस्थेतील लघुतार्याचा शेवटचा टप्पा) असू शकतो.’ मात्र, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, ‘या सिद्धांतांनी देखील संपूर्णपणे हे विचित्र वर्तन स्पष्ट होत नाही.
ही वस्तू कदाचित नवीन प्रकारच्या भौतिकशास्त्राचे संकेत देत असावी किंवा तार्यांच्या उत्क्रांतीसाठी नवीन मॉडेल्स आवश्यक आहेत. ‘ASKAP J1832-0911’ ही वस्तू LPT - Long- Period Transient या दुर्मीळ आणि तीव्र खगोलशास्त्रीय घटनांच्या वर्गात मोडते. अशा वस्तू अंतराळातील प्रकाशगृहांसारख्या रेडिओ तरंगांचे किरण बाहेर टाकतात. या गटातील पहिले उदाहरण 2022 मध्ये सापडले आणि आजपर्यंत फक्त 10 LPTs आढळले आहेत. पारंपरिक पल्सर्स (neutron stars) काही मिलीसेकंद किंवा सेकंदांच्या अंतराने संकेत पाठवतात, तर LPTs काही मिनिटांपासून तासाभराच्या अंतराने संकेत पाठवतात, जे पूर्वी वैज्ञानिकांना अशक्य वाटायचे. हेच त्यांना गूढ बनवते, इतक्या दीर्घ आणि नियमित कालावधीने ‘स्विच ऑन’ आणि ‘स्विच ऑफ’ होणे हे कोणत्याही ज्ञात यंत्रणेत बसत नाही. ASKAP ने रेडिओ संकेत शोधल्यावर, ‘नासा’च्या ‘चंद्रा एक्स-रे’ वेधशाळेने, जी योगायोगाने त्याच आकाशाच्या भागाकडे पाहत होती, त्याची एक्स-रे उत्सर्जनासहित पुष्टी केली. ही LPT ची एक्स-रेज मध्ये झालेली पहिलीच नोंद आहे.