

कॅनबेरा : गेल्या वर्षी शास्त्रज्ञांना आपल्या आकाशगंगेतून आलेल्या एका शक्तिशाली आणि रहस्यमय रेडिओ लहरींच्या स्फोटाचा शोध लागला होता. आता, खगोलशास्त्रज्ञांना वाटते की, याचे कारण नासाचा एक जुना, मृत उपग्रह असू शकतो; पण हे नक्की कसे घडले, याबद्दल ते अनिश्चित आहेत.
1964 साली अमेरिकेच्या नासा संस्थेने ‘रिले 2’ नावाचा एक कम्युनिकेशन सॅटेलाईट अवकाशात प्रक्षेपित केला होता. मात्र, केवळ तीन वर्षांनी, 1967 मध्ये, त्याचे दोन्ही ऑनबोर्ड ट्रान्सपॉन्डर्स निकामी झाल्याने तो कायमचा बंद पडला. पण, आता जवळपास 60 वर्षांनंतर, जून 2024 मध्ये, याच मृत उपग्रहातून एक अत्यंत शक्तिशाली आणि अनपेक्षित रेडिओ सिग्नल आल्याने संपूर्ण वैज्ञानिक जगतात खळबळ उडाली आहे. यासंबंधीचा एक अभ्यास 13 जून रोजी ‘arXiv’ या सर्व्हरवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्याचे अद्याप पुनरावलोकन झालेले नाही. ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ अॅस्ट्रॉनॉमीचे प्रमुख लेखक, प्राध्यापक क्लॅन्सी जेम्स यांनी ‘न्यू सायंटिस्ट’ला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ‘हा एक अविश्वसनीय शक्तिशाली रेडिओ पल्स होता, ज्याने अगदी कमी वेळेसाठी आकाशातील इतर सर्व गोष्टींना मागे टाकले.’
विशेष म्हणजे, हा रेडिओ स्फोट फक्त 30 नॅनोसेकंद टिकला. हा कालावधी त्या मृत उपग्रहाच्या कोणत्याही प्रणालीशी जुळत नाही, त्यामुळे हा सिग्नल हेतुपुरस्सर पाठवला गेला असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी फेटाळून लावली आहे. यामागे दोन प्रमुख शक्यता वर्तवण्यात येत आहेत : एकतर एखाद्या सूक्ष्म उल्कापिंडाच्या आघातामुळे किंवा उपग्रहावर वीज जमा झाल्यामुळे हा स्फोट झाला असावा. शास्त्रज्ञांना हा विचित्र सिग्नल पश्चिम ऑस्ट्रेलियातील ‘ऑस्ट्रेलियन स्क्वेअर किलोमीटर अॅरे पाथफाईंडर’ (ASKAP) या रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने सापडला. ही दुर्बीण आकाशातून येणार्या रेडिओ लहरींचा शोध घेत असते.