Jellyfish on Mars | मंगळावर दिसली गूढ ‘जेलीफिश’!

Jellyfish on Mars |
Jellyfish on Mars | मंगळावर दिसली गूढ ‘जेलीफिश’!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : नासाच्या ‘क्युरिओसिटी रोव्हर’ने मंगळ ग्रहावरून पाठवलेला एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एका दूरवरच्या खडकाळ टेकडीवर ‘जेलीफिश’च्या आकाराची एक रहस्यमयी काळी आकृती दिसत असून, यामुळे परग्रहावरील जीवांबद्दल (एलियन्‍स) विविध चर्चांना उधाण आले आहे.

हा फोटो क्युरिओसिटी रोव्हरने २० ऑगस्ट २०२३ रोजी त्याच्या उजव्या नॅव्हिगेशन कॅमेऱ्याने (Navcam) टिपला होता. त्यावेळी याकडे कोणाचे लक्ष गेले नाही; परंतु ऑगस्ट २०२६ मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्‍स’वर करि सिव्हर्टसेन नावाच्या युझरने हा फोटो शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला. फोटोत दिसणाऱ्या आकृतीला खालील बाजूस तंतू किंवा पाय असल्यासारखे दिसतात, ज्यामुळे ती सागरी जेलीफिशसारखी भासते.

निसर्गाची किमया की तांत्रिक बिघाड?

१५ पिक्सेलचा हा फोटो समोर आल्यानंतर खगोलशास्त्रज्ञांनी याबाबत वैज्ञानिक कारणे मांडली आहेत. अवकाशातील उच्च-ऊर्जेचे कॉस्‍मिक किरण कॅमेऱ्याच्या सेन्सरवर आदळल्यामुळे असा तात्पुरता काळा डाग निर्माण होऊ शकतो. त्‍याला ‘कॅमेरा आर्टिफॅक्ट’ असे म्‍हणतात. फोटो मंगळावरून पृथ्वीवर पाठवताना डेटा कॉम्प्रेशन किंवा प्रसारणात झालेल्या त्रुटीमुळे असा आकार तयार होऊ शकतो. वाऱ्यामुळे उडालेले धुळीचे चक्राकार वर्तुळ किंवा धुळीचे कण असू शकतात. त्‍यामुळे ही क्षणिक नैसर्गिक घटना असू शकते. या कॅमेऱ्याने अवघ्या २ मिनिटांपूर्वी टिपलेल्या फोटोमध्ये अशी कोणतीही आकृती नव्हती. तसेच ७८ मिनिटांनंतर घेतलेल्या दुसऱ्या छायाचित्रातूनही हा आकार गायब झाला होता. त्यामुळे ही मंगळाच्या पृष्ठभागावरील कायमस्वरूपी रचना नसून केवळ एका छायाचित्रातील तांत्रिक त्रुटी असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news