

तैपेई : तैवानच्या पश्चिम किनार्याजवळ समुद्रात सापडलेला रहस्यमय मानवी जबडा आपल्या प्रजातीचा किंवा निएंडरथल मानवाचा नाही, तर डेनिसोव्हन या आता नामशेष झालेल्या मानववंशाच्या नातेवाईकाचा आहे, असे नव्या संशोधनातून उघड झाले आहे. हा जबडा ‘पेंघू 1’ या नावाने ओळखला जातो. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस एका मच्छीमाराने तैवानच्या पेंघू चॅनेलच्या तळातून तो जाळ्यात पकडला होता. त्यानंतर या जबड्याच्या मूळ प्रजातीबद्दल वैज्ञानिकांमध्ये मतभेद होते, तो होमो इरेक्टस, प्राचीन होमो सेपियन्स की डेनिसोव्हन यांपैकी कोणाचा?
याचा उलगडा करण्यासाठी संशोधकांनी एक नावीन्यपूर्ण तंत्र वापरले, पॅलिओप्रोटिओमिक्स, म्हणजे प्राचीन प्रथिनांचे विश्लेषण. या तंत्राद्वारे त्यांनी जबड्यातील अमिनो आम्ल आणि प्रथिनांची संरचना तपासली आणि ती डेनिसोव्हन नमुन्याशी सर्वाधिक जुळणारी असल्याचे निष्कर्ष काढले. या संशोधनाचे निष्कर्ष ‘सायन्स’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले. याच तंत्राचा उपयोग करून इतर होमिनिन जीवाश्मांचे वर्गीकरण करणे शक्य होत आहे. हे नमुने डेनिसोव्हन, निएंडरथल की इतर कोणत्या मानव समूहाचे आहेत, हे ठरवता येते, असे कोपनहेगन विद्यापीठातील आण्विक मानववंशशास्त्रज्ञ आणि सहलेखक फ्रिडो वेल्कर यांनी सांगितले.
डेनिसोव्हन हे मानवाचे विलुप्त नातेवाईक होते, जे निएंडरथल आणि होमो सेपियन्स यांच्याच काळात जगत होते. मात्र, निएंडरथलचे जीवाश्म युरोप आणि पश्चिम आशियात अनेक आढळले असले, तरी डेनिसोव्हनचे जीवाश्म फारच कमी सापडले आहेत आणि बहुतेक सैबेरियातील डेनिसोव्हा गुहेत सापडले होते. त्यामुळे या समूहाचे जैविक वैशिष्ट्ये, त्यांचे वितरण आणि मानवाशी असलेले नाते समजून घेणे अत्यंत कठीण होते. ‘पेंघू 1’ चे प्रथिन विश्लेषण केल्यावर तो एक पुरुष असल्याचेही समोर आले. त्याच्या जबड्याचे दात मोठे आणि जबडा अधिक मजबूत असल्याने तो डेनिसोव्हन वैशिष्ट्यांसह जुळतो.