

कैरो ः जगभरातील शास्रज्ञांसाठी आजही कोडं असलेल्या इजिप्तमधील पिरॅमिडस्चं गूढ नव्या संशोधनानंतर अधिक वाढलं आहे. शास्त्रज्ञांनी रडार तंत्रज्ञानाचा वापर करून गिझाच्या पिरॅमिडजवळ जमिनीखाली एक मोठी भूगर्भीय रचना शोधून काढली आहे. पिसा विद्यापीठातील संशोधक कोराडो मलंगा आणि स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठातील फिलिपो बिओंडी यांच्या नेतृत्वाखालील टीमने येथील जमीन स्कॅन करण्यासाठी सिंथेटिक अपर्चर रडार (एसएआर) तंत्रज्ञान वापरले. त्यांनी केलेल्या या पहाणीच्या निष्कर्षांवरून गिझामधील तिन्ही मोठ्या पिरॅमिडच्या खाली सुमारे दोन किलोमीटर पसरलेले नेटवर्क आढळून आलं आहे.
खाफ—े पिरॅमिड हा गिझाच्या पठारावरील दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी मानवनिर्मित रचना असून त्याच्या पायथ्याजवळ पाच एकसारख्या रचना असल्याचे या संशोधनादरम्यान आढळून आले आहे. या रचनांमध्ये अनेक स्तर असून सर्व रचना भौमितिक मार्गांनी जोडलेल्या असल्याचं दिसून आलं आहे. या सर्व मार्गांच्या खाली आठ उभ्या दंडगोलाकार विहिरी सापडल्या आहेत. यापैकी प्रत्येक विहीर 648 मीटर खोलीपर्यंत उतरत्या गोलाकार मार्गांनी वेढलेली आहे. सर्वात खोल स्तरावरील मार्ग दोन मोठ्या घन आकाराच्या संरचनांशी जोडलेले दिसून आले आहेत. या रचना प्रत्येक बाजूला 80 मीटरपर्यंत पसरलेल्या आहेत. जमिनीखाली जवळपास 2 किलोमीटरपर्यंत हे सारं जाळं पसरलेलं आहे. आतापर्यंत पिरॅमिडस् ही केवळ शाही थडगी असल्याचं मानलं जातं होतं. मात्र हे नवं संशोधन पिरॅमिडस् केवळ शाही थडगे आहेत या दीर्घकाळापासून चालत आलेल्या विश्वासाला आव्हान देणारं असल्याचं रीझ रिपोर्टने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे. नव्या संशोधनामध्ये आढळून आलेली भूगर्भातील प्रणालीने यांत्रिक किंवा ऊर्जा-संबंधित कार्य केले असावे असा अंदाज यापूर्वी संशोधकांनी लावला होता. तो आता खरा ठरताना दिसत आहे. या पिरॅमिडस् खाली सापडलेल्या रचनांसंदर्भातील निष्कर्ष हे निकोला टेस्ला आणि क्रिस्टोफर डन सारख्या संशोधकांनी प्रस्तावित केलेल्या सिद्धांतांशी जुळणारे आहेत.
टेस्ला, वीज आणि वायरलेस ऊर्जेवरील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात. यामधून असं सुचवलं जात आहे की पिरॅमिड पृथ्वीच्या नैसर्गिक ऊर्जेचा वापर करू शकतात. ख्रिस्तोफर डन यांनी त्यांच्या ‘द गिझा पॉवर प्लांट’ या पुस्तकात, ‘ग्रेट पिरॅमिड भूगर्भातील कंपनांना वापरण्यायोग्य ऊर्जेमध्ये रूपांतरित करणारे यंत्र म्हणून कार्य करायचे,’ असा दवा केला आहे. नव्याने सापडलेले निष्कर्ष पिरॅमिडच्या उभारणीसंदर्भातील उद्देशाविषयी मागील अनेक शतकांपासून सुरू असलेल्या वादविवादांना हातभारच लावताना दिसत आहे. पिरॅमिडस्च्या बांधकामाविषयीच्या विद्यमान प्रश्नांबरोबरच नवीन प्रश्नही निर्माण झाले आहेत. प्रस्थापित सिद्धांतांना आव्हान देणार्या उत्खननाला इजिप्तमध्ये परवानगी दिली जात नाही. त्यामुळेच आता हे प्राथमिक संशोधन झालं असलं तरी पुढे यामध्ये किती संशोधन शक्य आहे आणि खरोखरच पिरॅमिमडस् का उभारण्यात आले याचं खरं कारण समोर येणार की नाही हे आताच सांगणं कठीण आहे!