Mysterious Cat : मृत्यूची पूर्वसूचना देणारे रहस्यमयी मांजर

‘ऑस्‍कर’ ज्या रुग्णाच्या बेडवर बसायचा त्याचा काही तासांतच व्हायचा मृत्यू
Mysterious Cat
मृत्यूची पूर्वसूचना देणारे रहस्यमयी मांजर
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : वैद्यकीय जगतात डॉक्टर आणि आधुनिक यंत्रसामग्री ज्या रुग्णाचा मृत्यू कधी होणार हे अचूक सांगू शकत नाही, ती गोष्ट एका साध्या मांजराने १०० हून अधिक वेळा करून दाखवली होती. ‘ऑस्कर’ नावाचे हे मांजर ज्या गंभीर रुग्णाच्या अंथरुणावर जाऊन बसायचे, अवघ्या काही तासांतच त्या रुग्णाचा मृत्यू व्हायचा. या मांजराच्या या थक्क करणाऱ्या शक्तीचे रहस्य आजही विज्ञानासाठी एक मोठे आव्हान बनले आहे.

या रहस्यमयी आणि सत्य घटनेवर आधारित असलेल्‍या ऑस्‍कर मांजराविषयीच्‍या गोष्‍टी आश्‍चर्यचकीत करणार्‍या अशाच आहेत. साल २००५ मध्ये अमेरिकेच्या रोड आयलँड येथील एका नर्सिंग होमने ऑस्कर नावाच्या काळ्या-पांढऱ्या रंगाच्या एका मांजराला दत्तक घेतले होते. सुरुवातीला शांत राहणाऱ्या ऑस्करमध्ये नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांना एक विचित्र सवय दिसून आली. ऑस्‍कर अचानक एखाद्या गंभीर रुग्णाच्या खोलीत जायचा आणि त्याच्या बेडवर जाऊन बसायचा. ऑस्कर बेडवर बसल्यानंतर अवघ्या २ ते ४ तासांत त्या रुग्णाची प्राणज्योत मालवायची.

१०० हून अधिक अचूक अंदाज

सुरुवातीला हा निव्वळ योगायोग मानला गेला, परंतु जेव्हा असे वारंवार घडू लागले तेव्हा डॉक्टरही चक्रावून गेले. २००७ मध्ये २५ मृत्‍यूंचा अंदाज वर्तवणाऱ्या ऑस्करने २०२२ मध्ये आपल्या मृत्यूच्या (वय १७ वर्षे) वेळेपर्यंत १०० हून अधिक रुग्‍णांच्‍या मृत्‍यूचा अचूक अंदाज वर्तवला होता.

डिमेंशियाच्या रुग्णांसाठी ठरला ‘देवदूत’

या नर्सिंग होममध्ये बहुतांश रुग्ण ‘डिमेंशिया’ (स्मृतिभ्रंश) या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात होते. अनेक रुग्ण अगदी एकटे होते. अशा वेळी ऑस्कर त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ जाऊन बसायचा आणि त्यांना मायेची ऊब द्यायचा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ऑस्कर हा सामान्यतः माणसाळलेला किंवा लाड करणारा मांजर नव्हता. तो नर्सिंग होममधील इतर सामान्य रुग्णांकडे किंवा कर्मचाऱ्यांकडे कधीच जात नसे, परंतु मृत्यू जवळ आलेल्या रुग्णाची साथ तो कधीच सोडत नव्हता.

काय म्हणतात वैज्ञानिक आणि डॉक्टर?

या रहस्यमयी घटनेवर डॉ. डेव्हिड डोसा यांनी २०१० मध्ये ‘मेकिंग राऊंडस्‌ विथ ऑस्कर’ नावाचे एक पुस्तकही लिहिले. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा मानवी शरीरातील पेशी (सेल्‍स) मृत पावू लागतात, तेव्हा शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक वायू किंवा गंध बाहेर पडतो. मानवी नाक हा गंध ओळखू शकत नाही, परंतु ऑस्करच्या तीक्ष्ण घाणेंद्रियांमुळे (वास घेण्‍याची शक्ती) तो हा गंध अचूक ओळखायचा आणि रुग्णाजवळ जाऊन बसायचा. जरी विज्ञानाने या मागे ‘गंध’ असण्याचे कारण दिले असले, तरीही डॉक्टरांच्या आधी रुग्णाचा शेवटचा काळ अचूक ओळखण्याची ऑस्करची ही नैसर्गिक शक्ती आजही जगाला थक्क करून सोडते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news