

वॉशिंग्टन : सध्याचा जमाना ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. जगातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये अद्ययावत ‘एआय’ टूल बनवून ते लाँच करण्यासाठी जणू काही अहमहमिकाच सुरू आहे. काही वर्षांपूर्वी ‘ओपन एआय’ने ‘चॅट जीपीटी’ लाँच केल्यानंतर अशा प्रकारच्या चॅटबोटस्चेही प्रस्थ वाढले. आता ‘टेस्ला’, ‘एक्स’ आणि ‘स्पेसएक्स’ अशा बड्या कंपन्यांचे सर्वेसर्वा असलेल्या एलन मस्क यांनी जगातील सर्वात स्मार्ट अशा ‘ग्रोक 3 एआय’ ला लाँच केले आहे. त्यांच्या ‘एक्स एआय’ कंपनीने हे नवे मॉडेल लाँच केले असून, त्यामध्ये कोडिंगपासून ते लाईव्ह गेम्स बनविण्यापर्यंत सर्व काही केले जाऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.
हे एआय मॉडेल प्रीमियम यूजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. लवकरच ‘ग्रोक 3’ चे एपीआय व्हर्जनही लाँच करण्यात येईल. त्याचा वापर कंपन्या करू शकणार आहेत. मस्क यांनी सांगितले की, हे एआय मॉडेल दोन लाख जीपीयूच्या मदतीने ट्रेन करण्यात आले आहे. हा जगातील सर्वात स्मार्ट एआय असेल. काही वर्षांपूर्वी चॅटजीपीटी लाँच झाल्यापासून अनेक कंपन्यांनी ‘एआय मॉडेल’ बनवण्यास सुरुवात केली होती. गुगलने आपला ‘जेमिनी’ आणला तर चीनने ‘डीपसीक’. आता याबाबतची खरी स्पर्धा सुरू झाली आहे. अमेरिकेलाही तगड्या एआयची गरज होती. ती मस्क यांच्याकडूनच पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, मस्क यांच्या कंपनीच्या दाव्यानुसार, हा एआय टेक डेव्हलपमेंटमध्येच आहे की अन्य बाबींमध्येही कार्यक्षम आहे, यावर या ‘एआय’ची खरी उपयुक्तता ठरेल. मस्क आणि ‘ओपन एआय’ मधील वितुष्ट जगजाहीर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावरून ‘ओपन एआय’ विकत घेण्यासाठी 97.4 अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती. सीईओ सॅम ऑल्टमन व कंपनीच्या बोर्डने ही ऑफर धुडकावून लावली. आता आठवडाभरातच मस्क यांनी त्यांचा ‘एआय’ लाँच केला आहे. मग मुळातच मस्क यांना ‘ओपन एआय’ का हवा होता, असाही प्रश्न विचारला जात आहे. ‘ओपन एआय’ चे ‘एआय’ जितकी माहिती देतो, तितकी मस्क यांचा ‘एआय’ देत नाही, असा याचा अर्थ होत असल्याचेही म्हटले जात आहे.