

बंगळुरू : कल्पना करा, तुम्ही एका मंदिरात आहात आणि तिथे दगडी खांबांना स्पर्श करताच त्यातून ‘सा, रे, ग, म, प, ध, नि’ असे संगीताचे सूर निघू लागतात... ही कोणतीही जादू किंवा काल्पनिक कथा नाही, तर दक्षिण भारतातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये आजही अनुभवता येणारा एक जिवंत चमत्कार आहे. हे ‘संगीत स्तंभ’ (Musical Pillars) किंवा ‘सप्तस्वर स्तंभ’ प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र आणि ध्वनिशास्त्राच्या प्रगत ज्ञानाची साक्ष देतात, जे आजही आधुनिक वैज्ञानिकांना आणि इतिहासकारांना आश्चर्यचकित करतात.
हे स्तंभ म्हणजे प्राचीन स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहेत. हे प्रामुख्याने विजयनगर साम्राज्याच्या काळात (14 वे ते 16 वे शतक) आणि पांड्य राजांनी बांधलेल्या मंदिरांमध्ये आढळतात. एकाच मोठ्या दगडातून हे स्तंभ कोरलेले असून, प्रत्येक मुख्य स्तंभाच्या भोवती अनेक छोटे-छोटे आणि पातळ स्तंभ कोरलेले आहेत. या प्रत्येक छोट्या स्तंभाला बोटांनी किंवा लाकडाच्या हलक्या तुकड्याने वाजवल्यास त्यातून संगीताचा एक वेगळा आणि स्पष्ट सूर निघतो. विठ्ठल मंदिर, हंपी (कर्नाटक) येथील 56 संगीत स्तंभ जगप्रसिद्ध आहेत. यांना ‘सारेगम स्तंभ’ म्हणूनही ओळखले जाते. मीनाक्षी अम्मन मंदिर, मदुराई (तमिळनाडू) येथील हजार खांबी मंडपात पाच मोठे संगीत स्तंभ आहेत, जे वेगवेगळ्या प्राण्यांच्या आणि देवतांच्या मूर्तींनी सजवलेले आहेत. नेल्लईअप्पर मंदिर, तिरुनेलवेली (तमिळनाडू) येथील दगडी स्तंभांमधून निघणारे संगीत अतिशय मधुर असल्याचे म्हटले जाते.
सुचिंद्रम थानुमलायन मंदिर, कन्याकुमारी (तमिळनाडू) येथील चार मोठे स्तंभ प्रत्येकी 24 ते 33 छोट्या स्तंभांनी बनलेले आहेत, जे संगीताचे विविध सूर निर्माण करतात. या स्तंभांमागे कोणतेही गूढ नसून शुद्ध विज्ञान आणि अभियांत्रिकी आहे. संशोधकांच्या मते, या स्तंभांसाठी विशिष्ट प्रकारच्या खडक किंवा ग्रॅनाइट दगडांची निवड केली गेली. या दगडांची घनता, लांबी, जाडी आणि कोरण्याची पद्धत इतकी अचूक आहे की, त्यातून निर्माण होणारे कंपन एका विशिष्ट वारंवारतेचा ध्वनी निर्माण करते, जो संगीताच्या सुरासारखा ऐकू येतो. एकाच दगडातून वेगवेगळ्या जाडीचे स्तंभ कोरून त्यातून सप्तसूर निर्माण करणे, हे त्या काळातील कारागिरांच्या अफाट ज्ञानाचे प्रतीक आहे.