नवी दिल्ली : मास्क हे एअरोसोल आणि व्यक्ती यांच्यामध्ये एखादी भिंत बनूनच राहतात. त्यामुळे विषाणू संक्रमणापासून बचाव करण्यासाठी मदत मिळते. मात्र, केवळ एकाच स्तराचा मास्क उपयुक्त ठरत नाही. अनेक स्तरांचा विशेषतः तीन स्तरांचा मास्क यासाठी उपयुक्त ठरतो असे भारतीय विज्ञान संस्था 'आयआयएससी'मधील संशोधकांनी केलेल्या प्रयोगातून पुन्हा एकदा दिसून आले आहे.
ज्यावेळी एखादी व्यक्ती खोकते त्यावेळी तिच्या तोंडावर असलेल्या मास्कच्या आतील पृष्ठभागावर अतिशय वेगाने ड्रॉपलेटस् पडतात. त्यांचा आकार 200 मायक्रॉनपेक्षा अधिक असतो. ते वेगाने मास्कच्या पृष्ठभागावर पसरतात आणि छोट्या छोट्या भागात विभाजित होऊन एअरोसोलमध्ये रूपांतरीत होतात. अशाच कारणामुळे 'सार्स-कोव्ह-2' सारख्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा इतरांना धोका वाढतो. संशोधकांनी एका हायस्पीड कॅमेर्याचा वापर करून एक, दोन आणि तीन स्तरांच्या मास्कवर कफ ड्रॉपलेटस्चा वापर करून याबाबतच्या चाचण्या घेतल्या. एक स्तराच्या मास्कमध्ये ड्रॉपलेटस्चा आकार शंभर मायक्रॉनपेक्षाही कमी असतो व लहान आकारामुळे त्यांचे इतरांना संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. कपड्यांनी बनवलेले तीन स्तरांचे मास्क किंवा एन-95 मास्कच सुरक्षा देऊ शकतात असे वरिष्ठ संशोधक सप्तर्षी बसू यांनी म्हटले आहे.