

न्यूयॉर्क : शास्त्रज्ञांनी एका नवीन प्रयोगाद्वारे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या महत्त्वाच्या पेशींना पुन्हा ‘तरुण’ करण्यात यश मिळवले आहे. ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, एमआरएनए (mRNA) उपचारांमुळे उंदरांच्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशींचे पुनरुज्जीवन झाले असून, यामुळे कर्करोग आणि विविध संसर्गांशी लढण्याची त्यांची क्षमता वाढली आहे.
आपल्या शरीरातील ‘टी-सेल्स’ या इतर पेशींना रोगांशी लढण्यासाठी प्रशिक्षित करण्याचे काम करतात. मात्र, वय वाढते तशी या पेशींची कार्यक्षमता कमी होते आणि त्या बाह्य धोक्यांना प्रतिसाद देण्यास मंदावतात. तसेच, ज्या ‘थायमस’ ग्रंथीत या पेशी तयार होतात, ती ग्रंथीदेखील वयानुसार आकुंचन पावू लागते. याच कारणामुळे तरुण व्यक्तींच्या तुलनेत वृद्धांमध्ये लस किंवा कर्करोगावरील उपचार कमी प्रभावी ठरतात.
संशोधकांनी वृद्ध उंदरांचा अभ्यास करताना अशा तीन प्रथिनांचा शोध लावला, ज्यांचे प्रमाण वयानुसार कमी होते. या उणीवेमुळेच पेशींचे वृद्धत्व वेगाने वाढते. शास्त्रज्ञांनी या तीन प्रथिनांसाठी आवश्यक असलेले ‘एमआरएनए’ तयार केले आणि ते मेदाच्या (फॅट) सूक्ष्म बुडबुड्यांद्वारे 16 महिने वय असलेल्या (मध्यमवयीन) उंदरांच्या शरीरात टोचले. हे ‘एमआरएनए’ रक्ताद्वारे यकृतात पोहोचले. यकृत रक्ताचे शुद्धीकरण करत असल्याने, रक्तातील टी-सेल्स जेव्हा यकृतातून गेल्या, तेव्हा त्यांचा संपर्क या ‘एमआरएनए’ शी आला.
ज्या उंदरांवर हे उपचार करण्यात आले, त्यांच्या शरीरात नवीन टी-सेल्सची निर्मिती वाढली. तसेच, या उंदरांनी लसीकरण आणि ‘कॅन्सर इम्युनोथेरपी’ला अधिक चांगला प्रतिसाद दिला. ‘एमआरएनए’ हे शरीरात फार काळ टिकत नाही, ते लवकर नष्ट होते. त्यामुळे या संशोधनात उंदरांना आठवड्यातून दोनदा हे इंजेक्शन द्यावे लागले. उपचार थांबवताच त्याचा प्रभाव लगेच कमी झाला. शास्त्रज्ञांच्या मते, हा परिणाम टिकवून ठेवण्यासाठी वारंवार डोस द्यावे लागतील.