

केप टाऊन : निसर्गात माणूस आणि प्राण्यांमधील संघर्षाच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो; परंतु मोझांबिकमध्ये माणूस आणि एका छोट्या पक्ष्यामध्ये कमालीची ‘सहकार्याची भावना’ पाहायला मिळत आहे. नव्या संशोधनानुसार, मोझांबिकमधील मध शोधणारे शिकारी ‘हनीगाईड’ नावाच्या पक्ष्यांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या स्थानिक बोलीभाषांचा वापर करतात आणि या समन्वयामुळे दोन्ही प्रजातींचा फायदा होतो.
‘पीपल अँड नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून ही रंजक माहिती समोर आली आहे. ‘ग्रेटर हनीगाईड’ (Indicator indicator) हे दक्षिण आफ्रिकेत आढळणारे लहान तपकिरी रंगाचे पक्षी आहेत. हे पक्षी माणसांना मधमाश्यांच्या पोळ्यापर्यंत नेतात, म्हणून त्यांना ‘हनीगाईड’ असे नाव पडले आहे. माणसांशी त्यांचा संवाद होण्यासाठी आधी शिकारी एका विशिष्ट आवाजाद्वारे पक्ष्याला बोलावतो. त्यानंतर पक्षी स्वतःच्या आवाजात प्रतिसाद देऊन शिकार्याला पोळ्यापर्यंत मार्गदर्शन करतो. शिकारी आगीच्या साहाय्याने मधमाश्यांना पळवून लावतो आणि मध काढतो.
शिकार्याला मध मिळते, तर पक्ष्याला उरलेले मेण आणि अळ्या खायला मिळतात. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत पक्ष्याला मधमाश्यांच्या डंखाचा धोका राहत नाही. केप टाऊन विद्यापीठातील संशोधक जेसिका व्हॅन डर वॉल आणि त्यांच्या सहकार्यांनी उत्तर मोझांबिकमधील 13 गावांत 131 शिकार्यांच्या आवाजांचे रेकॉर्डिंग केले. त्यांना असे आढळले की, प्रत्येक गावानुसार पक्ष्यांशी संवाद साधण्याच्या पद्धती (शिट्ट्या, गुरगुरणे किंवा विशिष्ट आवाज) बदलतात. जर एखादा शिकारी दुसर्या गावात राहायला गेला, तर तो तिथल्या स्थानिक बोलीभाषेत पक्ष्यांशी संवाद साधायला शिकतो.
माणसांप्रमाणेच पक्ष्यांशी संवाद साधण्याच्या या पद्धतीतही कमालीची विविधता आहे. हे पक्षी स्थानिक आवाजांना अधिक प्रतिसाद देतात, ज्यामुळे या बोलीभाषा टिकून राहण्यास मदत होते. ‘हा केवळ एक संवाद नाही, तर माणूस आणि वन्यजीव यांच्यातील सक्रिय समन्वयाचे उत्तम उदाहरण आहे,’ असे जेसिका व्हॅन डर वॉल यांनी सांगितले. संशोधकांच्या मते, माणूस आणि या पक्ष्यांमधील हे नाते शेकडो किंवा हजारो वर्षांपासून चालत आले असावे. महत्त्वाचे म्हणजे, हे पक्षी त्यांचे ‘पालक’ नसलेल्या इतर पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतात. त्यामुळे ते ही कला त्यांच्या आई-वडिलांकडून शिकत नाहीत, तर अनुभवातून आत्मसात करतात.