

वॉशिंग्टन : जगात अनेक बिग बजेट आणि सुपरहिट चित्रपट आलेले आहेत. हॉलीवूडच्या ‘गॉन विथ द विंड’ पासून ‘टायटॅनिक’पर्यंत आणि भारतातील ‘मुघल-ए-आझम’ पासून ‘बाहुबली’पर्यंत अनेक चित्रपटांची चर्चा सातत्याने होत असते. मात्र एक चित्रपट असा बनला होता ज्याच्या बजेटचे रेकॉर्ड मोडणे कठीण आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 3321 रुपयांचे होते. हा आजपर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईही सर्वाधिक केली होती हे विशेष. या चित्रपटाचे नाव ‘पायरेटस् ऑफ द कॅरिबियन : ऑन स्ट्रेंजर टाईडस्’.
2011 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट समुद्री चाचा ‘जॅक स्पॅरो’ भोवती फिरणार्या कथानकाचा होता. चित्रपटात जॅक स्पॅरो आणि बार्बोसा जादूच्या कारंज्याच्या शोधात निघतात, मात्र त्यांना आढळते की डाकू ब्लॅकबियर्ड आणि त्याची मुलगीही ते मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला. रॉब मार्शल दिग्दर्शित या चित्रपटात हॉलीवूड स्टार जॉनी डेप समुद्री डाकू जॅक स्पॅरोच्या भूमिकेत दिसला आहे. हा चित्रपट जगातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभर यश मिळवले. चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 379 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 3321 कोटी रुपये खर्च झाले. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 8,762 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. ‘पायरेटस् ऑफ द कॅरिबियन’ चित्रपट मालिकेची सुरुवात 2003 मध्ये झाली. ‘द कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल’ हा या मालिकेतील पहिला चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता.