

काठमांडू : जगातील सर्वात उंच पर्वतशिखर असा लौकिक असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांच्यानंतर हजारो लोकांनी यशस्वी आरोहण केले आहे. आता तर तिथे दरवर्षी इतकी गर्दी होते की जणु काही ’ट्रॅफिक जाम’ असावा! या शिखरावर गिर्यारोहकांची लांबच लांब रांग लागलेली असते. मात्र एव्हरेस्टवर गिर्यारोहण करणे हे खर्चिक कामही आहे. आता तर ते आणखी महागडे झाले आहे. नेपाळने एव्हरेस्टवर जाण्यासाठीच्या परवाना शुल्कात 36 टक्क्यांची गलेलठ्ठ वाढ केली आहे. तसेच या शिखरावर कचरा पसरू नये यासाठी अनेक पावलेही उचलली आहेत. नव्या नियमांनुसार यावर्षी मार्च ते मे या कालावधीत दक्षिण मार्गाने एव्हरेस्टवर जाणार्या परदेशी लोकांसाठी परमिट शुल्क सध्याच्या 11 हजार डॉलर्स प्रति व्यक्तीवरून 15 हजार डॉलर्स प्रति व्यक्ती करण्यात आले आहे.
पर्यटन बोर्डच्या संचालिका आरती न्यूपा यांनी सांगितले की याबाबत कॅबिनेटने आधीच निर्णय घेतलेला आहे. आता केवळ त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. नव्या आदेशानुसार सप्टेंबर-नोव्हेंबर या काळातील गिर्यारोहणाचे शुल्क 5500 डॉलर्सवरून 7500 डॉलर्स प्रति व्यक्ती करण्यात आले आहे. तसेच डिसेंबर-फेब्रुवारी आणि जून-ऑगस्ट या कालावधीत परमिट शुल्क प्रति व्यक्ती 2750 अमेरिकन डॉलर्सवरून 3750 अमेरिकन डॉलर्स केले आहे. याशिवाय परमिटचा कालावधी 75 दिवसांवरून कमी करून तो 55 दिवसांवर आणला आहे. ’काठमांडू पोस्ट’ या दैनिकातील वृत्तानुसार गिर्यारोहणाचा कालावधी कमी करण्यामागे सुनियोजनाचा हेतू आहे. गिर्यारोहणासाठीचे हे नवे शुल्क 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल. 8848.86 मीटर उंचीच्या या पर्वतशिखरावर चढण्यासाठी 2025 च्या वसंत ऋतुपूर्वीच स्विकार केलेल्या बुकिंगवर या बदलाचा परिणाम होणार नाही.