Mount Etna volcano: माऊंट एटना ठरला जगातील सर्वात वेगळा ज्वालामुखी

इटलीच्या सिसिली बेटावर असलेला प्रसिद्ध ‌‘माऊंट एटना‌’ हा पृथ्वीवरील इतर कोणत्याही ज्वालामुखीसारखा नाही, असा खुलासा एका नवीन संशोधनातून झाला
Mount Etna volcano
Mount Etna volcano
Published on
Updated on

रोम : इटलीच्या सिसिली बेटावर असलेला प्रसिद्ध ‌‘माऊंट एटना‌’ हा पृथ्वीवरील इतर कोणत्याही ज्वालामुखीसारखा नाही, असा खुलासा एका नवीन संशोधनातून झाला आहे. ‌‘जेजीआर सॉलिड अर्थ‌’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या ज्वालामुखीची निर्मिती अत्यंत विचित्र पद्धतीने झाली असून, ती समुद्राच्या तळाशी आढळणाऱ्या ‌‘पेटिट-स्पॉट‌’ ज्वालामुखींशी मिळतीजुळती आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ युटा येथील पेट्रोलॉजिस्ट सारा लॅम्बर्ट यांच्या मते, ‌‘हे संशोधन ज्वालामुखी विज्ञानातील एका नवीन प्रकाराचे प्रतिनिधित्व करते.‌’ साधारणपणे समुद्राच्या तळाशी असलेले ‌‘पेटिट-स्पॉट‌’ ज्वालामुखी केवळ काही शंभर फूट उंचीचे असतात. मात्र, माऊंट एटना समुद्रसपाटीपासून चक्क 11,165 फूट (3,403 मीटर) उंच आहे.

स्वित्झर्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लॉसने येथील भूविज्ञान व्याख्याते सेबॅस्टिन पिलेट यांच्या मते, आतापर्यंत ज्वालामुखींचे तीन मुख्य प्रकार मानले जात होते : 1. मिड-ओशन रिज : जेथे समुद्राच्या प्लेटस्‌‍ एकमेकांपासून लांब जातात. 2. इंट्राप्लेट (हॉटस्पॉट) : जसे की हवाई बेटे किंवा यलोस्टोन, जिथे जमिनीखालील एका विशिष्ट उष्ण भागामुळे उद्रेक होतो. 3. सबडक्शन झोन : जसे की जपानचा माऊंट फुजी, जिथे एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली सरकते.

परंतु, माऊंट एटना यापैकी कोणत्याही श्रेणीत तंतोतंत बसत नाही. तो आफ्रिकन आणि युरेशियन प्लेटस्‌‍ जिथे एकमेकांना मिळतात, अगदी त्याच रेषेवर स्थित आहे. संशोधकांना माऊंट एटनाबद्दल दोन मुख्य गोष्टी अनाकलनीय वाटतात : लाव्हारसाचे स्वरूप : रासायनिकदृष्ट्या एटनाचा लाव्हारस एखाद्या ‌‘हॉटस्पॉट‌’ ज्वालामुखीसारखा दिसतो. परंतु, या डोंगराखाली कोणताही हॉटस्पॉट असल्याचे पुरावे नाहीत. विचित्र उत्क्रांती : आपल्या इतिहासाच्या सुरुवातीला एटनामधून कमी प्रमाणात ‌‘सिलिका‌’युक्त लाव्हारस बाहेर पडला.

परंतु, नंतर अचानक मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियमसारख्या ‌‘अल्कली‌’ धातूंनी समृद्ध असलेला लाव्हारस बाहेर येऊ लागला. सामान्यतः अल्कलीयुक्त लाव्हारस कमी प्रमाणात बाहेर पडतो. मात्र, एटनाच्या बाबतीत हे उलटे घडले आहे. एटनामध्ये नेमके काय घडत आहे, हे समजून घेण्यासाठी सेबॅस्टिन पिलेट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ज्वालामुखीच्या इतिहासातील लाव्हारसाच्या विविध थरांच्या भू-रासायनिक रचनेचा अभ्यास केला आहे. या संशोधनामुळे पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली आणि ज्वालामुखीच्या निर्मितीबाबतचे जुने समज बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news