

सुरत : एवोकॅडो हे फळ म्हणजे पोषक तत्त्वांचा खजिनाच आहे. आता केवळ सेलिब्रिटीच नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्याही आहारामध्ये हे गुणकारी फळ समाविष्ट झाले आहे. मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील हे फळ प्रोटीन व अन्य पोषक घटकांनी संपन्न असते. त्याचा सॅलेड व टोस्टमधील वापरही लोकप्रिय होत आहे. आता या फळाचा वापर करून बनवलेले एक टोस्ट आपल्या देशात सर्वात महागडे ठरले आहे. गुजरातच्या सुरतमधील एका स्ट्रीट वेंडरने एवोकॅडो टोस्ट लोकप्रिय केले आहे. या टोस्टची किंमत 13 हजार रुपयांपर्यंत आहे!
इन्स्टाग्रामवरील एका यूजरने याबाबतचे एक रील शेअर केले आहे. त्यामध्ये हा विक्रेता एवोकॅडो टोस्ट बनवत असताना दिसून येतो. एवोकॅडोच्या तुकड्यांना तो ऑलिव्ह ऑईल, तीळ, खास मसाले आणि लिंबूच्या रसात मिसळतो. त्यानंतर यामध्ये तो एक विशेष चीज टाकतो, ज्यामुळे हे टोस्ट अतिशय महागडे बनते. या टोस्टचे मुख्य आकर्षण आहे हे ‘पुले चीज’. हे चीज जगातील सर्वात महागड्या व दुर्मीळ चीजपैकी एक आहे. हे चीज सर्बियाच्या जासाविका स्पेशल नेचर रिझर्व्हमधून येते. ते बनवण्यासाठी 60 टक्के गाढविणीचे दूध आणि 40 टक्के बकरीचे दूध यांचे मिश्रण वापरले जाते. या चीजचा स्वाद अतिशय खास असतो. पुले चीज बनवण्यासाठी गाढविणीच्या 6.5 गॅलन दुधाची गरज असते. एक गाढवीण सहा महिन्यात केवळ एक गॅलनच दूध देते. त्यामुळेच हे चीज इतके दुर्मीळ व महाग आहे. या चीजची किंमत 83 हजार रुपये प्रति किलो आहे. हे चीज टोस्टमध्ये वापरल्याने हे एवोकॅडो टोस्ट महाग बनते. 13 हजार रुपयांचे टोस्ट खाण्याबाबत अनेक युजर्सनी अर्थातच संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत!